Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Konkan › ‘ईव्हीएम’च्या खात्रीला ‘व्हीव्हीपॅट’चा विश्‍वास

‘ईव्हीएम’च्या खात्रीला ‘व्हीव्हीपॅट’चा विश्‍वास

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 9:08PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘ईव्हीएम’च्या (व्होटिंग  मशिन)  विश्‍वासाबाबात बहुतांश राजकीय पक्षांनी अंगुलीनिर्देश केले असताना आता ‘ईव्हीएम’च्या खात्रीला ‘व्हीव्हीपॅट’चा विश्‍वास देण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकीत करण्यात येणार आहे. याच महिन्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रणेचा प्रयोग विभागनिहाय करण्यात येणार आहे. त्यानुसार कोकणात रायगड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत ही प्रायोगिकता तपासण्यात येणार आहे. जिल्ह्यात या यंत्रणेचा प्रसार प्रशासनातर्फे सुरू करण्यात आला असून त्याचे प्रात्यक्षिकही अभ्यासण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

डिजिटल युगात शासनाने सर्वच यंत्रणा ऑनलाईन केल्याने निवडणुकीतही शासनाने डिजिटायजेशनचे प्रयोग सुरू केले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बहुतांश निवडणुका ‘ईव्हीएम’द्वारे घेण्यात येत असताना अलीकडेच केवळ  पदवीधर मतदारसंघाची  निवडणूक  बॅलेटपेपरद्वारे घेण्यात आली होती. मात्र, अलीकडच्या काळात झालेल्या राज्यातील निवडणुकीत तसेच पोटनिवडणुकीत वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’बाबत राजकीय पक्षांनी आक्षेप घेतलेे होते. तर काही राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनाही पुन्हा ‘बॅलेट पेपर लाओ’चा  आंदोलनाद्वारे  आवाज उठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

‘ईव्हीएम’ला विश्‍वासाहर्ता जोडताना आता नव्याने होणार्‍या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा प्रयोग करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.   या मशिनद्वारे मतदान यंत्र वापरून मतदारांना मतदानाचा अभिप्राय देण्याची पद्धत आहे. ‘व्हीव्हीपॅट’ मतदान यंत्रांना स्वतंत्र यंत्रणा म्हणून कार्यरत  राहणार असून ज्याद्वारे मतदारांना त्यांचे मत योग्यरित्या देण्यात आल्याचे साक्षांकीत करण्यात येते. तसेच यामुळे निवडणुकीत फसवणुकीचा किंवा अवैध मतदानाचा शोध लावण्यास आणि संग्रहित इलेक्ट्रॉनिक परिणामांचे ऑडिट करण्यासाठी एक  साधन म्हणून निवडणूक  यंत्रणेसाठीही ही प्रणाली  उपयोगात येणार आहे.  

यंत्राची कार्यप्रणाली प्रात्यक्षिकांसह दाखविण्याचा उपक्रम
जिल्ह्यात सध्या सुलभ मतदान योजनेंतर्गत मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून यंत्रणेचा प्रचार प्रशासनातर्फे  सुरू करण्यात आला आहे. मतदारांना या यंत्रणेची माहिती मिळावी, यासाठी सुलभ मतदान योजनेत या यंत्राची कार्यप्रणाली प्रात्यक्षिकांसह दाखविण्याचा उपक्रम प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे. या यंत्राची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र विभागनिहाय करताना कोकणातील रायगड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात येणार आहे.