Fri, Jul 19, 2019 01:43होमपेज › Konkan › अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांच्या कामासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर!

अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांच्या कामासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर!

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:54PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

महावितरणच्या माजगाव सबस्टेशनसाठी अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांच्या कामामध्ये गॅस जॉईंडचे काम करीत असताना घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा वापर खुलेआम होत असून यामुळे रस्त्यावरुन जाणारी वाहतूक धोकादायक बनली आहे. या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

गेले काही दिवस चराठा चर्च ते माजगाव उद्यमनगर असे वीज वाहिन्या अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरु आहे. चराठा चर्चपर्यंत आलेल्या ओव्हरहेड वीजवाहिन्या नव्याने होणार्‍या माजगाव उद्यमनगर वीज सबस्टेशनमध्ये अंडरग्राऊं ड नेल्या जात आहेत. या अंडरग्राऊं ड वीजवाहिन्या  जोडण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. 

मात्र, यासाठी कमर्शियल गॅसचा खर्च वाचविण्यासाठी घरगुती गॅस  सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे दिसून आले. या जोडणी करीत असताना सिलिंडरचा स्फोट होऊ न मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय अंडरग्राऊंड वीजवाहिन्यांच्या खाली दूरसंचारची ओएफसी लाईन आहे. या ओएफसी  लाईनमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती कशी करणार असा प्रश्‍न आहे. 

याशिवाय चराठा ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन याच वाहिन्यांच्या खाली आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या या तिन्ही वाहिन्या धोकादायक बनून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. पंधरा दिवसापूर्वी रस्त्याच्या कडेला चर खोदून मातीचा भराव टाकल्याने या भरावावर दुचाकी आदळून ओटवणे येथील काजरेकर नामक युवक जखमी झाला होता. या युवकाचा रुग्णालयात झालेला उपचाराचा खर्च देण्याचे आश्‍वासन संबंधित ठेकेदाराच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, रातोरात भराव हटवून साफसफाई करण्यात आली.  या चरामुळे एकापाठोपाठ एक असे तीन दुचाकीस्वार जखमी झाले होते. त्यांनाही कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही तसेच जखमींचा विचारपूसही केली नाही. 

दरम्यान, याबाबत महावितरणचे सावंतवाडी येथील उपकार्यकारी अधिकारी अमोल राजे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करुन घरगुती गॅस सिलिंडर न वापरण्याबाबत तसेच सुरक्षित गॅस सिलिंडर वापरण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला देणार असल्याचे सांगितले.