होमपेज › Konkan › वीज दुरुस्तीसाठी 3 कोटींचा निधी वापरा

वीज दुरुस्तीसाठी 3 कोटींचा निधी वापरा

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 8:57PM

बुकमार्क करा

नागपूर : काशिराम गायकवाड 

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळातील वीज वितरण कंपनीचा 3 कोटींचा निधी दुरुस्ती, पोल व वाहिन्या बदलणे आणि अन्य दुरूस्तीच्या कामांसाठी वापरण्याचे आदेश ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनखुळे यांनी दिले.सन 2016 ते 2018 पर्यंतच्या कृषीपंप कनेक्शनसाठी राज्याच्या बजेट मधून निधी देण्याचे आश्‍वासनही ना. बावनकुळे यांनी आ.वैभव नाईक यांना दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज समस्यांचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथील बिजलीघर विश्रामगृहावर ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी गुरूवारी खास बैठक घेतली.यावेळी सिंधुदुर्गच्या वतीने आ. नाईक यांनी जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर, कॅपेसीटर, वीजवाहिन्या व अन्य विजवितरणच्या दुरूस्तीसाठी निधी नसल्याने कामे होत नाहीत याबाबत लक्ष वेधताच ना. बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन मंडळाने विज वितरणसाठी जो 3 कोटी रू.चा निधी मंजूर करण्यात आला आहे तो वापरावा,असे आदेश दिले तसेच कृषीपंप कनेक्शनसाठी वेगळा निधी देण्याचे आश्वासन दिले. ज्या विभागातील 100 शेतकरी कृषीपंपासाठी अर्ज सादर करतील त्यांच्यासाठी 1 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प शासन राबविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

बीव्हीजीकडून तत्काळ कामे पूर्ण करून घ्या

ट्रान्सफॉर्मर, सडलेले विजपोल व वाहिन्या बदलणे आदी महत्त्वाची कामे बीव्हीजी कंपनीला दिली. यापूर्वी कामे पूर्ण करून घेण्याबाबत सूचना करूनही 50 टक्केही कामे झालेली नाहीत. याकडे आ. नाईक यांनी लक्ष वेधले असता ना.बावनकुळे यांनी बीव्हीजीकडून कामे पूर्ण करून घेण्याच्या सक्‍त सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.त्यामुळे तत्काळ सिंधुदुर्गला सुविधा देण्यात याव्यात.

दर महिन्याला आ.नाईक यांच्या समवेत बैठक घेऊन आढावा घेण्याचे निर्देश ना.बावनकुळे यांनी दिले. यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आय. प्रकाश आबीटकर, अमोल महाडिक, सत्यजीत पाटील, उल्हास पाटील, डॉ.सुजीत मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, अनिल बाबर यांच्यासह सिंधुदुर्गातील वीजवितरणचे अधिकारी उपस्थित होते.