Thu, Sep 20, 2018 14:08होमपेज › Konkan › प्रधानमंत्री बिजली योजनेचा लाभ शहरी ग्राहकांनाही!

प्रधानमंत्री बिजली योजनेचा लाभ शहरी ग्राहकांनाही!

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 8:52PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर’ या  योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील नागरिकांना घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘सौभाग्य योजने’तून वीज उपलब्ध नसलेल्या घरांसाठी वीज पुरवठा करण्यात येणार असून दारिद्र्यरेषेखाली घरांना निशुल्क तर दारिद्र्यरेषेवरील घरांसाठी नाममात्र 500 रुपये मोजावे लागणार आहेत.

वीज पुरवठा नसणार्‍या ग्रामीण भागासह दुर्गम भागातीलही घरांना मार्च 2019 पर्यंत वीजपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील अतिदुर्गम भागातील घरांना मार्च 2019 पर्यंत स्वतंत्र सौरउर्जा संचामार्फत वीज पुरवठा सौभाग्य योजनेतून करण्यात येईल. 

तसेच शहरी भागातील गरीब व आर्थिक मागास कुटुंबाच्या सर्व घरांना मार्च अखेरपर्यंत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या घरांना अद्याप वीज पुरवठा झालेला नाही अशा बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांनी नजीकच्या महावितरण कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा, तसेच अर्ज सादर करून वीज जोडणी करून घ्यावी, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी केले.

इच्छुक ग्राहकांकडून अर्ज प्राप्त झाल्यावर तातडीने वीज जोडणी करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील सरपंचांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.