Wed, Jul 24, 2019 12:43होमपेज › Konkan › रेल्वेचे ‘अनोखे हॉटेल’ प्रवाशांच्या सेवेत

रेल्वेचे ‘अनोखे हॉटेल’ प्रवाशांच्या सेवेत

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:30PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

‘टाकाऊतून टिकाऊ’चा संदेश देण्याबरोबरच आरामदायी रेल्वे गाडीत बसून अल्पोपहाराचा स्वाद घेण्याची संधी कोकण रेल्वेने उपलब्ध केली आहे. वापरात नसलेल्या रेल्वे डब्यांचा उपयोग करून उभारण्यात आलेले हे हॉटेल कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकानजीक ग्राहकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.

प्रवासी तसेच  मालवाहतुकीशिवाय कोकण रेल्वेने या आधीही प्रवाशांसाठी नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण सेवा,  प्रवासादरम्यान मधुमेही रुग्णांसाठी मधुमेह पूरक आहार, स्थानकांवर प्रवाशांसाठी लिफ्ट, सरकते जिने आदी सुविधांचा समावेश आहे. याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान तेजस एक्स्प्रेसारख्या गाड्यांमध्ये मेनूच्या यादीत मोदकाचा समावेश केल्याने प्रवाशांकडून या मेनूला चांगला प्रतिसाद मिळाला. रेल्वेच्या या समयसूचकतेची प्रवाशांकडून वेळोवेळी प्रशंसादेखील करण्यात आली.

रेल्वे स्थानकांच्या परिसरात उभारण्यात येणार्‍या उपाहारगृहाला कोकण रेल्वेने रेल्वेगाडीचा लूक देऊन प्रवासी तसेच पर्यटकांना रेल्वेकडे आकर्षित करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. कोकण रेल्वेने याची सुरुवात मडगाव स्थानकापासून केली आहे. त्यानुसार या स्थानकानजीक रेल्वे गाडीच्या वापरात नसलेल्या डब्यांचा उपपयोग करून सुंदर हॉटेल सुरू करण्यात आले आहे.  रेल्वे डब्याच्या आंतरभागामध्ये बदल करून हे उपहारगृह  रेल्वेने बनविले आहे. 

या हॉटेलमध्ये बसल्यावर एखाद्या अलिशान रेल्वेगाडीत बसल्याचा भास होईल, अशी याची रचना करण्यात आली आहे. या हॉटेलसाठी रेल्वेने वापरात नसलेल्या डब्यांचा वापर करुन ‘टाकावूतून टिकावू’चा संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे.