Wed, Mar 20, 2019 23:34होमपेज › Konkan › ‘कोरे’ची अनारक्षित तिकिटे लवकरच मोबाईलवर

‘कोरे’ची अनारक्षित तिकिटे लवकरच मोबाईलवर

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 10:19PMरत्नागिरी :  दीपक शिंगण

मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नईसारख्या शहरांप्रमाणेच कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वेची अनारक्षित तिकिटे मोबाईलद्वारे काढता येणार आहेत. यामुळे आता ‘कोरे’च्या प्रवाशांना करंट तिकिटांसाठी खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही. जनरल तिकिटे  रेल्वेच्या युटीएस अ‍ॅपद्वारे आरक्षित करता यावीत, यासाठी कोकण रेल्वेने ‘क्रिस’ (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) या संस्थेशी करार केला आहे.

जनरल श्रेणीतील तिकिटांसाठी आरक्षण खिडकीवर न जाता प्रवाशांना मोबाईलद्वारे तिकिटे काढता यावीत, यासाठी रेल्वेने युटीएस या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. मात्र, या अ‍ॅपच्या मदतीने सध्या जिथे लोकल रेल्वे सुविधा आहे, अशाच मोठ्या शहरांमध्येच अनारक्षित (करंट) तिकिटे बुक करता येतात. उदा. पुण्या -मुंबईसारख्या शहरातील लोकल प्रवासाच्या तिकिटाबरोबरच अशा शहरांतून रेल्वेचे जाळे असलेल्या देशातील छोट्या शहरांमध्ये जाण्यासाठी जनरल तिकिटे काढता येतात. मात्र, यासाठी स्थानकावरील एटीव्हीएम मशीनवर सहज उपलब्ध होणार्‍या तिकिटाची प्रिंट प्रवाशाला सोबत ठेवावी लागते. उपनगरीय सेवा उपलब्ध असलेल्या महानगरांमध्ये युटीएस अ‍ॅपद्वारे काढलेले तिकीट प्रवासादरम्यान तपासनीसाने मागितल्यास मोबाईलवर दाखवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 

हीच सेवा कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांनादेखील लवकरच उपलब्ध होणार आहे. या सेवेसाठी कोकण रेल्वेचा ‘क्रिस’ या रेल्वेच्या संस्थेशी करार झाला आहे. 
यामुळे गर्दीच्या वेळी करंट तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याऐवजी प्रवाशांना मोबाईलवरच अवघ्या काही क्लिकवर तिकिटे काढता येणे शक्य होणार आहे.