Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Konkan › आमदारांनाच रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव : जयंद्रथ खताते

आमदारांनाच रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव : जयंद्रथ खताते

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 9:20PMचिपळूण : प्रतिनिधी

येथील आमदारांना रस्त्यावरील खड्ड्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते, हे दुर्दैव आहे. आमदारांचा प्रशासनावर अजिबात वचक नाही. तरीही ते चिपळूणमध्ये कोणतीही अडचण नाही असे सांगतात, अशी टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

येथील जि. प. विश्रामगृहात गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी रमेश राणे व कार्यकर्ते उपस्थित होते. खताते म्हणाले, येथील आ. सदानंद चव्हाण चिपळुणात कोणतीच अडचण नाही, असे सांगतात. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका दौरा करणार आहे. रस्त्यांवरील खड्डे भरावेत म्हणून आमदारांना रस्त्यावर उतरावे लागते. त्यांचा तालुक्यातील प्रशासनावर अजिबात वचक राहिलेला नाही.

चिपळूण हे  जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असताना येथे पोलिस निरीक्षक प्रभारी आहेत. हे चिपळूणचे दुर्दैव आहे. चिपळूण पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी येतात. मात्र, त्या दाखल करून घेतल्या जात नाहीत. त्यांचा तपास होत नाही. मात्र, या प्रश्‍नांबाबत लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत, असा आरोप खताते यांनी केला. तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रश्‍नांबाबत लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गावभेट दौरा घेण्यात येणार आहे. या दौर्‍यात माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रत्येक विभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जि. प., पं. स. सदस्य, सरपंच, माजी सरपंच आदी सहभागी होणार आहेत. दि. 4 ऑगस्टपासून हा गावभेट दौरा सुरू होणार असून तालुक्यातील पूर्व विभागातून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.

दि. 4 रोजी तिवरे, तिवडी, कादवड, आकले, दि. 6 रोजी नांदिवसे, ओवळी, कळकवणे, रिक्टोली, दि. 7 रोजी पेढांबे, नागावे, कोळकेवाडी, अलोरे, खडपोली, गाणे, वालोटी, दि. 8 ऑगस्ट रोजी पोफळी, कुंभार्ली, कोंडफणसवणे, मुंढे व तळसर आदी ठिकाणी गावभेट दौरा होणार आहे. या दौर्‍यात पक्षीय संघटना बांधणी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असल्याची माहिती यावेळी खताते यांनी दिली.