Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत भूमिगत कामांना प्रारंभ

महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत भूमिगत कामांना प्रारंभ

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:36PMकुडाळ : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला आता बरीच गती आली आहे. झाडे तोडणे, सपाटीकरण यानंतर आता भूमिगत कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. यात मोरीसाठी सिमेंट पाईप बसवणे, महावितरणच्या अंडरग्राऊंड वाहिन्यांची जोडणी यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेेत. त्यामुळे आता महामार्ग चौपदरीकरण अल्पावधीत गती पकडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला आता बराच वेग आला आहे. दोन महिन्यात महामार्गावरील झाडे तोडणे या कामानंतर आता महिनाभरात भर टाकून सपाटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली होती. ठेकेदार कंपनीकडील अद्ययावत मशिनरीमुळे या कामानेही महिनाभरात गती पकडली आहे.या सपाटीकरणामुळे महामार्गाचे स्वरूप स्पष्ट होत आहे. यानंतर आता ठेकेदार कंपनीने  आता भूमिगत कामांना सुरुवात केली आहे. महामार्गावरून अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज वाहिन्या जात आहे. 

महामार्ग चौपदरीकरणच्या नियमानुसार महामार्गावरून कोणत्याही वीज वाहिन्या जावू नयेत.यासाठी या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले होते. यानुसार महावितरणने हे काम हाती घेतले आहे. अद्ययावत मशिनरीचा वापर करून या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत झाराप येथे हे काम सुरू आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी अशाप्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे. महामार्गावर पाणथळ भागात मोरी बांधण्यात येणार आहेत. यासाठी सिमेंट पाईप बसवण्याचेही कामही आता हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या आकाराचे पाईप बसविण्यात येणार आहेत. यासाठी असे पाईप अनेक ठिकाणी टकण्यात आले आहेत. महामार्गावर एक ते दोन किमी. परिसरात अशा प्रकारच्या मोरीची बांधणी करण्यात येत आहे.चौपदरीकरणादरम्यान टाकण्यात आलेल्या भरावामुळे अनेक ठिकाणचे पाण्याचे मार्ग बुजणार आहेत.अशा ठिकाणी सिमेंट पाईप टाकून हे मार्ग सुस्थितीत ठेवण्यात येणार आहेत.अन्यथा पावसाळयात पाण्याचा निचरा थांबून महामार्गावर पाणी येण्याची संभावना आहे.

तसेच यामुळे लगतच्या भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच त्याठिकाणी मोठे पूल उभारणे शक्य नाही व ज्याठिकाणी शेतांमध्ये जाण्याचे छोटे मार्ग आहेत अशा ठिकाणी शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी छोटे बॉक्सेल पूल बांधण्यात येणार आहेत. या कामांनाही  आता सुरुवात करण्यात आली आहे.