Sun, Jul 21, 2019 12:00होमपेज › Konkan › सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत १८ कोटी

सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत १८ कोटी

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 8:50PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 8 हजार 326 शेतकर्‍यांना 18 कोटी 67 लाख रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले असून उर्वरित 4 हजार 600 प्रस्तावांसाठीही 15 दिवसांत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समद्ध जनकल्याण योजना, विविध विस्तार योजना, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजना आदींचा आढावा आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली. 
आगमी खरीप आराखड्यानुसार जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाला प्राधान्य देण्यात आले आहे.  खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

जिल्हा प्रशासनाने महत्त्वाकांक्षी केलेल्या फळ लागवड योजनेतही  शेतकर्‍यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या नियोजन आराखड्यानुसार उद्दिष्ट पूर्तता करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्भवणार्‍या तांत्रिक अडचणी सोडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.