होमपेज › Konkan › जिल्ह्यात गर्भपात गोळ्यांचे अनधिकृत वितरण

जिल्ह्यात गर्भपात गोळ्यांचे अनधिकृत वितरण

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:11PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

अधिकृत गर्भपात केंद्रांद्वारेच गर्भपात गोळ्या देणे योग्य आहे. तथापी सिंधुदुर्गात काही जनरल प्रॅक्टीशनर्स द्वारे गर्भपात गोळ्या अनधिकृतपणे रुग्णांना दिल्या जातात, ही बाब गंभीर आहे. अशाप्रकारे अनधिकृतपणे गर्भपात गोळ्या देणे हा गुन्हा आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनामार्फत आवश्यक तपासणी करुन कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीत करण्यात आली.

जिल्हा ग्राहक संरक्षण  समितीची बैठक नियोजन समिती सभागृहात  अतिरिक्‍त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहाय्यक परिवहन अधिरारी एस.एस.मगदूम, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी संजय गवस, अन्न व औषध विभागाचे सहाय्यत आयुक्‍त तु.ना.शिंगाडे  व्यासपिठावर होते. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांच्या पुरवठा शाखेत परिषदेच्या अशासकीय सदस्यांचे नाव व संपर्क क्रमांक दर्शविनारा फलक लावावा, सावंतवाडी नगरपालिका प्रशासनास केबल टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांचे व गटारींचं झालेलं नुकसान संबंधिक विभागाकडून पूर्ववत करुन घेण्याबाबत सूचना द्याव्यात, रेल्वे स्थानकापासून शहरात येणार्‍या किंवा गावी जाणार्‍या प्रवाशांकडून अवास्तव रिक्षा भाडे आकारले जाते या बाबत परिवहन विभागाने कारवाई करावी, काजू बी वर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सेस वसूल केला जातो तो योग्य आहे का? या बाबत कृषि विभागाने सविस्तर माहिती द्यावी, आठवडा बाजारात बसणार्‍या विक्रेत्यांच्या वजन-मापाची तपासणी  करावी, रासायनिक प्रक्रिया करून आंबा, केळी आदी फळे पिकविली जातात.

याबाबत अन्न व औषध विभागाने तपासणी करुन अहवाल सादर करावा, याच बरोबर दुधातील भेसळ, बेकरी उत्पादन तयार होतात अशा ठिकाणी पदार्थ निर्मिती करताना स्वच्छतेविषयक दक्षता घेतली जाते का याचीही विभागाने तपासणी करावी आदी सूचना यावेळी अशासकिय सदस्यांनी केल्या. चर्चेत अशासकीय सदस्य डॉ. राजेश नवांगुळ, नकुल पार्सेकर, गुरुनाथ मडवळ, सुभाष गोवेकर, जगन्नाथ वळंजू, सुरेंद्र बांदेकर, जयराम राऊळ यांनी सहभाग घेतला.