Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Konkan › उद्धव ठाकरे उद्या राजापुरात

उद्धव ठाकरे उद्या राजापुरात

Published On: Apr 21 2018 11:15PM | Last Updated: Apr 21 2018 11:08PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व स्थानिकांना भक्‍कम बळ देण्यासाठी सोमवारी 23 रोजी सागवे येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत शिवसेनेची तोफ कशी धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान, मनसे, शिवसेना आदी पक्ष प्रकल्पाच्या विरोधात उतरले आहेत. रिफायनरी प्रकल्पाच्या औद्योगिकीकरणासाठी अध्यादेश काढला म्हणून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकल्पावरून शिवसेनेला कोंडीत पकडायचे व त्यांच्यावर चौफेर हल्ले चढवायचे, असे प्रयत्न सध्या शिवसेनेच्या विरोधकांकडून सुरू  आहेत.

त्या पाश्‍वर्र्भूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दि. 23 एप्रिलला नाणार दौर्‍यावर येत आहेत. त्यावेळी ते शिवसेनेवर होत असलेल्या या टीकेचा कसा समाचार घेतात. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढलेल्या अध्यादेशावर काय बोलतात,  यासह  रिफायनरी प्रकल्पाला विरोध करताना राज्य शासनासंदर्भात कोणती भूमिका जाहीरपणे मांडतात, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नाणार दौर्‍याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सेनेचे संपर्क नेते विजय कदम आदी उपस्थित राहणार आहेत.