Mon, Apr 22, 2019 06:27होमपेज › Konkan › ‘चिपी’ उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती! 

‘चिपी’ उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती! 

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:37PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सिंधुदुग-चिपी विमानतळावर बुधवार, 12 सप्टेंबर रोजी विमानाचे लँडिंग होणार आहे. या शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निमंत्रित केल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ना. केसरकर म्हणाले, चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे.  विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य मंत्री उपस्थितीत राहणार आहेत. 

या विमानातळामुळे  जिल्ह्याच्या विकासाला वेग येणार आहे. येथील स्थानिक युवकांना वैमानिकांचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळाला वीज पुरवठा करणार्‍या वीजवाहिन्या महामार्गाशेजारुन जातील. 12 सप्टेंबरच्या लँडींग मुहूर्तासाठी विमानतळावर लागणारी सिक्युरिटी स्थानिक पोलिसांमार्फत तैनात केली जाणार असल्याचे ते म्हणाले.  त्या नंतर तीन महिन्यांनी म्हणजेच 12 डिसेंबरला चिपी विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय विमान उतरेल, असा विश्‍वास  ना. केसरकर यांनी व्यक्त केला. आम्ही कागदी विमान उडविणार नाही तर खर्‍याखुर्‍या विमानाचे लँडिंग करणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

महामार्गावर व मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे  8 सप्टेंबरला पुन्हा  जिल्हा दौरा करणार आहेत. तर गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी 6 सप्टेंबरला बैठकीचे आयोजन केल्याचे  ना.केसरकर यांनी सांगितले.

खा. नारायण राणेंना ना. प्रभूंकडून निमंत्रण

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमासाठी आपल्याला पालकमंत्र्यांनी निमंत्रण दिले नसले, तरी खुद्द हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. आपण या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थितीत राहणार आहे. कारण चिपी विमानतळ हे माझेच स्वप्न असून त्याचे खेरे श्रेय माझेच असल्याचा दावा खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.