Fri, Jan 24, 2020 22:26होमपेज › Konkan › ठाकरे, पवार यांच्या गुहागरात होणार सभा

ठाकरे, पवार यांच्या गुहागरात होणार सभा

Published On: Apr 04 2019 1:56AM | Last Updated: Apr 03 2019 8:47PM
शृंगारतळी : वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिमगोत्सवानंतर या निवडणुकीतील प्रचाराची रंगत  दिवसेंदिवस  वाढू लागली आहे. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 10 एप्रिलला शृंगारतळीत येणार असून काँगे्रस, राष्ट्रवादी  काँगे्रस आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शृंगारतळी येथे 13 एप्रिलला जाहीर सभा घेणार आहेत. 

केंद्रीय अवजड उद्योग मंञी खासदार अनंत गीते यांनी आचारसंहिता जारी होण्यापूर्वी 9 मार्चला शृंगारतळी येथे गुहागर तालुका शिवसेनेचा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी याच ठिकाणी सभा  घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला व त्यानंतर सुनिल तटकरे यांनी गुहागर तालुक्यातील जि.प.गटात आबलोली वेळणेश्‍वर व देवघर येथे जाहीर प्रचार सभा केल्या. या सर्व सभांना राष्ट्रवादी काँगे्रसने मोठी उपस्थिती जमा केली होती. त्यानंतर 7 एप्रिल रोजी शृंगारतळीत  अनंत गीते यांची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली  आहे तर गीतेंच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 10 एप्रिलला शृंगारतळीत येत आहेत.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ना. रामदास कदम सुभाष देसाई पालकमंत्री रविंद्र वायकर यांसह कोकणातील सेनेचे  आमदार उपस्थित राहणार आहेत तर भाजपाचे ना. रविंद्र चव्हाण माधव भंडारी व अन्य नेते उपस्थित राहतील, असे समजते. 

13 एप्रिल रोजी सुनिल तटकरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शृंगारतळीत येत आहेत. सुनील तटकरे यांनी गुहागर विधानसभा मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली असून शरद पवारांच्या गुहागर भेटीकडे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.