Sat, Dec 14, 2019 02:15होमपेज › Konkan › तिवरे दुर्घटनेतील दोन बेपत्तांचा शोध सुरूच

तिवरे दुर्घटनेतील दोन बेपत्तांचा शोध सुरूच

Published On: Jul 10 2019 1:40AM | Last Updated: Jul 09 2019 11:13PM
चिपळूण : खास प्रतिनिधी

तिवरेतील दुर्घटनेला आठ दिवस होत असतानाच अजूनही एक-दीड वर्षांची चिमुकली आणि महिला बेपत्ताच आहे. आतापर्यंत वीस मृतदेह हाती लागले असून, उर्वरित दोघांचा शोध एनडीआरएफचे जवान घेत आहेत. मंगळवारी शोधकार्य सुरूच होते. दोघांचा शोध लागेपर्यंत हे शोधकार्य सुरूच राहणार आहे.

तिवरेतील धरण फुटून दि. 2 रोजी दुर्घटना घडली. त्यात 22 जण बेपत्ता झाले तर 13 घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या धरणफुटीने 40 लोकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा आकडा दहा कोटींवर जाण्याची शक्यता आहे.     

घरे, गोठे, जनावरांच्या हानीचे पंचनामे झाले आहेत. अजूनही शेतीचे पंचनामे सुरू असून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये आकले, तिवरे, कादवड येथील पाणीपुरवठा योजना, महावितरण, रस्ते, पाखाडी तसेच साकव, तिवरे भेंदवाडी येथील मोरी, स्मशान शेड व एका मंदिराचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा लवकरच होणार आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा दहा कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी 5 वाजता आकले गावाजवळ अनिता चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. अजूनही दीड वर्षांची दुर्वा चव्हाण तसेच सुशिला धाडवे या बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असून एनडीआरएफचे जवान परिसरातील नदीनाल्यातून दिवसभरातील बारा तास शोधकार्य राबवत आहेत. पाऊस, दुथडी वाहणार्‍या नद्या अशाही परिस्थितीत नदीपात्र आणि दोन्ही किनार्‍यावरुन हे शोधकार्य सुरू आहे. एनडीआरएफचे प्रमुख गावडे व साठ जवान या शोधकार्यात सक्रिय आहेत. मंगळवारी एनडीआरएफचे जवान शोधकार्य थांबविण्याच्या विचारात होते. मात्र, सोमवारी सायंकाळी एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने आणखी दोन बेपत्ता असलेल्यांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम लांबली आहे. मंगळवारी दिवसभर त्यांनी विविध ठिकाणी शोधकार्य केले. मात्र, अद्याप बेपत्ता असलेल्या दोघांपैकी एकही व्यक्‍ती सापडलेली नाही.