Tue, Feb 19, 2019 06:39होमपेज › Konkan › महामार्गावर अपघातात दोघेजण जागीच ठार

महामार्गावर अपघातात दोघेजण जागीच ठार

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 11:07PMलांजा : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील वाकेड येथे झालेल्या दोन वाहनांच्या समोरासमोरील धडकेत दोनजण जागीच ठार तर  दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास  घडली. 

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप नथुराम पिलणकर हे इटीओस कार (एम.एच. 08/ झेड. 1863) घेऊन रत्नागिरी येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे निघाले होते. तर कडूस अन्सारी हे आपल्या मालकीची झायलो कार (एम.एच. 08 /बी 0274) हे राजापूर येथून रत्नागिरीला कामानिमित्त जात असताना सोमवारी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास वाकेड -बोरथडे फाटा येथे या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात इटीओस गाडीचे मालक प्रदीप नथुराम पिलणकर (53) व त्यांच्याच गाडीतून प्रवास करणारा रोहित मोहन मांडवकर (28,  दोघेही रा. रत्नागिरी) हे जागीच ठार झाले. झायलो गाडीचे चालक सदाशिव सोलकर (50 रा. तिवंदा माळ, राजापूर) व कडूस अन्सारी  (25) हे दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. गाडीचे चालक सदाशिव सोलकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कोल्हापूरला हलविण्यात आले असून कडूस अन्सारी यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रदीप पिलणकर हे शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे कामाला होते. त्यांची नुकतीच सिंधुदुर्ग ओरस येथे बदली झाली होती. ते  सोमवारी त्याठिकाणी हजर होण्यासाठी निघाले होते. अशाच वेळी ही घटना घडल्याने अनेकांनी हळहळ व्यक्‍त केली.अपघाताची खबर पोलिस पाटील जयवंत जाधव यांनी लांजा पोलिस ठाण्यात दिली. या वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील सुमारे 1 तास वाहतुकीचा खोळंबा झाला. दोन्ही वाहनांतील मृत व्यक्‍तींना तसेच 

जखमींना लांजा शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करून तातडीने रत्नागिरी येथे हलविण्यात आले. त्यानंतर जखमींपैकी एकाला कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मृतदेहांचे लांजा येथेच शवविच्छेदन करण्यात आले असून सायंकाळी उशिरा ते  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताची खबर मिळताच लांजा पोलिसांचे पथक घटनास्थळी तातडीने रवाना झाले. यामध्ये  उपनिरीक्षक पंडित पाटील, सुनील चवेकर, संदेश जाधव, पांडुरंग खिलारे, जयश्री माळी, मेघा खांबे आदींनी घटनास्थळी जाऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.