होमपेज › Konkan › फणस भरलेला ट्रक उलटला नांदगावातील दोघे ठार

फणस भरलेला ट्रक उलटला नांदगावातील दोघे ठार

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 9:52PMनाणीज : वार्ताहर

पाली-वेळवंड-बावनदी बायपास रस्त्यावर मौजे निवळी शेल्टेवाडी वळणावर एक ट्रक उलटून नांदगावातील दोघे ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. शनिवारी रात्री पावणेबारा वाजता हा अपघात झाला.  यात देवेंद्र आत्माराम बिडये (वय 46) जागीच ठार झाले, तर जयवंत किरण बिडये (40) यांचे उपचार चालू असताना निधन झाले. 

याबाबतची माहिती अशी की, रात्री नांदगाव बिडयेवाडी (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथून फणस भरलेला ट्रक (एमएच-07 एक्स-1790) मुंबई-भांडूपला चालला होता. वटपौर्णिमेसाठी येथून विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात फणस नेले जातात. फणसाची विक्री करण्यासाठी चालकासह 7 जण ट्रकमध्ये होते. हा ट्रक पाली बावनदी बायपास रस्त्याने चालला होता. शेल्टेवाडी येथे एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने व घसरल्याने तो उजव्या बाजूला उलटला. या अपघातात विठ्ठल विजय बिडये, राजेश बाळकृष्ण ताबे, लक्ष्मण नारायण बिडये, अश्‍विनी लक्ष्मण बिडये व चालक अनिकेत लक्ष्मण बिडये असे 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. पालीचे पोलिस संजय झगडे घटनेचा तपास करीत आहेत. महामार्ग पोलिसांनी जखमींना रत्नागिरीला नेण्यास सहकार्य केले.