Thu, Apr 25, 2019 23:40होमपेज › Konkan › मार्लेश्‍वरसाठी दोन कोटी

मार्लेश्‍वरसाठी दोन कोटी

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 8:29PMदेवरूख : वार्ताहर

श्री क्षेत्र मार्लेश्‍वरच्या विकास आराखड्याला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत मार्लेश्‍वर विकासासाठी 2 कोटींचा निधी देण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. त्यामुळे या तीर्थक्षेत्रावरील समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2018 - 19 ची राज्यस्तरीय बैठक गुरुवारी,  दि. 15 रोजी मंत्रालयात झाली.

या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, राजन साळवी, उदय सामंत, संजय कदम, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेसह संगमेश्‍वर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मार्लेश्‍वरची त्यांनी अधिकार्‍यांसह  पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधांसाठी नवा विकास आराखडा तयार केला होता. यात मार्लेश्‍वरसाठी 2 कोटीचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यावर काहीच हालचाल झालेली नव्हती. प्रस्तावित विकास आराखड्यासाठी निधी मिळावा म्हणून मंत्रालयात झालेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी गणपतीपुळ्यासह मार्लेश्‍वर विकासाचा विषय लावून धरला. 

मार्लेश्‍वरच्या विकासासाठी सादर केलेल्या 2 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची तसेच तातडीने निधी देण्याची मागणी केली. याला होकार देत वित्तमंत्री मुनगुंटीवार यांनी हा निधी तातडीने देण्याचे मान्य केले. या निधीतून रस्ते, पार्किंग, सुशोभीकरण, भक्‍तनिवास, पाणी योजना असे विविध प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.