Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Konkan › देवबाग समुद्रात दोन पर्यटक मुलांचा बुडून मृत्यू

देवबाग समुद्रात दोन पर्यटक मुलांचा बुडून मृत्यू

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 10:58PMमालवण : प्रतिनिधी

देवबाग संगम पॉईंट येथील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यास आलेल्या पुणे येथील पर्यटकांमधील दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 3.30 वा.च्या सुमारास घडली.निखिलेशसिंग जालिंदरसिंग राजपूत (10) व मानसी मनोज चव्हाण (13) अशी बुडून मयच झालेल्यांची  नावे आहेत. अनघा उर्फ परी मनोज चव्हाण हिला वाचविण्यात स्थानिकांना यश आले.
पुणे येथील तीन कुटुंबीय पर्यटनासाठी मालवणात आले होते.

यात जालिंदरसिंग जयसिंग राजपूत (40), त्यांची पत्नी योगिता राजपूत, मुलगा निखिलेशसिंग, मुलगी भार्गवी, मनोज बबन चव्हाण, त्यांची पत्नी अर्चना चव्हाण, मुलगी मानसी व अनघा यांसह निवदेकर कुटुंबीय असे एकूण 12 सदस्य मालवणात आले होते. जालिंदरसिंग राजपूत, मनोज चव्हाण व निवदेकर हे पुणे येथे इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. मालवण येथे आल्यावर घुमडे येथे निवासास थांबलेल्या या तिन्ही कुटुंबीयांनी शनिवारी दुपारी जेवणखाण आटोपून समुद्री पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने देवबाग गाठले. देवबाग येथे कर्ली नदी व अरबी समुद्र एकत्र मिळणार्‍या संगम पॉईंट किनार्‍यावर हे कुटुंब समुद्र स्नानासाठी समुद्रात उतरले.

स्नानाचा आनंद लुटत असतानाच यातील निखिलेशसिंग राजपूत व मानसी चव्हाण, अनघा उर्फ परी चव्हाण हे तिघेजण सहा फूट खोल पाण्यात गेल्याने बुडाले. तिघेजण पाण्यात बुडत असल्याचे इतर पर्यटकांनी दिसताच त्यांनी तात्काळ समुद्रात धाव घेत मानसी हिला प्रथम बाहेर काढले व मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी देवबाग येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिक योगेश केळुसकर, बाबली चोपडेकर, मकरंद चोपडेकर, दत्ता चोपडेकर, दत्ता धुरी, भाई चिंदरकर, राजन राऊळ, पंकज धुरी, चेतन तोरसकर, हरेष राणे, नागेश चोपडेकर यांनी धाव घेत अनघा हिला पाण्याबाहेर काढले. तर निखिलेशसिंग हा समुद्रात बेपत्ता झाला.अत्यवस्थ असलेल्या मानसी चव्हाण हिला तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

समुद्रात बेपत्ता झालेल्या निखिलेशसिंगचा स्थानिकांनी शोध घेतला असता काही कालावधीत तो अत्यवस्थ स्थितीत समुद्रात सापडून आला. त्याला पाण्याबाहेर काढून स्थानिक व्यावसायिकांनी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दुचाकीवरूनच तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच निखिलेशसिंग व मानसी हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मानसी चव्हाण व निखिलेशसिंग यांना मृत घोषित करताच त्यांच्या आई-वडिलांनी एकच आक्रोश केला.दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही रात्री उशिरपर्यंत सुरू होती. समुद्रात पर्यटक बुडल्याची माहिती समजताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बाळू कोळंबकर, भाई मांजरेकर नगरसेवक दीपक पाटकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.