Sun, Jul 21, 2019 16:55
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › हर्णै नौका दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह सापडले

हर्णै नौका दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह सापडले

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 11:08PM दापोली : वार्ताहर

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रात मंगळवारी रात्री  ‘एकविरा आई’ ही  बोट भीषण आग लागून भस्मसात झाली.   या दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर बोटीवरील चौघांनी समुद्रात उड्या घेतल्या. यातील रफिक मुकादम (45, कर्ला, रत्नागिरी) व मेहबूब सय्यद (40, माजगाव, बीड) यांना वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले आहे. मात्र, आरिफ अब्बास मुजावर हा तांडेल (58,  देवगड) व हनिफ कुरेशी (50, उत्तरप्रदेश) हे दोघे बेपत्ता झाले होते. त्या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. आरिफ यांचा मृतदेह लाडघर आणि हनिफ कुरेशी यांचा मृतदेह कोळेथर येथे आढळला.

रफिक मुकादम यांचा मच्छी व्यवसाय असून पुढील हंगामासाठी मुंबई येथील ट्रॉम्बे येथून त्यांनी ‘एकविरा आई’ ही 6 सिलिंडरची जुनी बोट 3 लाख 20 हजार एवढ्या किमतीत तोंडबोलीवर घेतली होती. ही बोट रत्नागिरीत आणण्यासाठी  देवगड येथील आरिफ मुजावर व मुंबईतील मित्र हनिफ कुरेशी याला सोबत घेतले.  मंगळवारी सकाळी ते रत्नागिरीकडे निघाले. संध्याकाळच्या आत रत्नागिरीत पोहचण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, वार्‍याचा वेग व पाण्याला करंट यामुळे त्यांचा अंदाज चुकला.बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांची बोट श्रीवर्धन समुद्रात पोहोचली. यावेळी तांडेल आरिफला रफिक मुकादम यांनी श्रीवर्धन येथेच जेवण व मुक्काम करण्याचा  सल्ला दिला. मात्र, तांडेल यांना लवकरात लवकर बोट रत्नागिरीत पोहोचवून पुन्हा रेल्वेने मुंबई गाठायची असल्याने त्यांनी त्यास नकार दिला. यावेळी रफिक यांनी बोटीचे इंजिन खूप तापल्याने थांबण्याची विनंती केली. मात्र, तांडेल यांनी दाभोळ येथे थांबू असे सांगून बोट दाभोळच्या दिशेने हाकली. मात्र, बोट आंजर्ले येथील समुद्रात आली असता रेडीएटरमधील पाणी संपले. यामुळे इंजिन प्रचंड तापून बोटीच्या केबिनने पेट घेतला.  

बोटीची केबिन पेटल्याचे लक्षात येताच  मेहबूब सय्यद यांनी तत्काळ आरडाओरड करीत सर्वांना सावध केले. सर्वांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला.  आग आटोक्यात येत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे पिंप केबिनमध्ये फोडले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आता बोट जळून कोणत्याही क्षणी बुडणार हे लक्षात आल्यावर सर्वांनी जवळील मासेमारी करणार्‍या बोटींवरील खलाशांना मदतीसाठी हाका मारल्या. अखेर सर्वांनी दोरीच्या साहाय्याने भर समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. दोरीच्या सहाय्याने समुद्रात उतरल्यावर आगीत दोर्‍याही जळून गेल्या.  त्यामुळे  असहाय्यपणे जळणारी बोट पाहात चौघेही किनार्‍याच्या दिशेने पोहत होते. एका स्थानिक बोटीवरील खलाशांनी त्यांचा आवाज ऐकला व त्यांनी प्रथम रफिक यांना बोटीवर ओढून घेतले व वाचविण्याचे प्रयत्न केले. थोड्या वेळाने मेहबूब दिसल्यावर त्यांनाही बोटीवर घेण्यात आले. या  दोघांना मच्छीमारांनी हर्णे येथील किनार्‍यावर सुखरूप आणून सोडले. यानंतर पोलिसांनी रफिक व मेहबूब यांना शहरातील उपजिल्हा रूग्णालयात आणून अधिक उपचारासाठी दाखल केले.  दरम्यान, दुर्घटना झाल्यानंतर बेपत्ता असलेल्या दोघांचा कोस्टगार्ड व पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांना स्थानिक मच्छीमारांनी साथ दिली.