Fri, Jan 24, 2020 23:24होमपेज › Konkan › पाणीटंचाईग्रस्त वाड्यांचे द्विशतक पार

पाणीटंचाईग्रस्त वाड्यांचे द्विशतक पार

Published On: Jun 11 2019 1:21AM | Last Updated: Jun 10 2019 10:44PM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात टंचाईग्रस्त वाड्यांची संख्याही वाढत आहे. गत आठवड्यात आणखी 50 वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, आतापर्यंत 122 गावांतील टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या 245 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 32 हजार 414 ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.

दिवसेंदिवस तापमान वाढ होत असल्याने जलस्रोत आटत आहेत. पाण्याचा उपसा वाढत असताना उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या आठवड्यात 110 गावांमधील 195 वाड्यांत टंचाई होती. त्यात या आठवड्यात 50 वाड्यांची भर पडली आहे. जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सर्वाधिक 29 गावांतील 54 वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. येथे 1 शासकीय आणि 1 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल खेड तालुक्यात 28 गावांतील 48 वाड्यांत पाणी टंचाई आहे. येथे 1 शासकीय आणि 6 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील 17 गावांतील 34 वाड्यांत पाणीटंचाई असून, दोन शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. लांजा तालुक्यात 7 गावांतील 14 वाड्यांत एक शासकीय व एक खासगी अशा दोन टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. गुहागरात 4 गावांतील 16 वाड्या आणि संगमेश्‍वरात 18 गावातील 33 वाड्यांना टंचाईची झळ बसली आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत 7 शासकीय आणि 17 खासगी अशा 24टँकर्समार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी 9 जूनपर्यंत जिल्ह्यात 74 गावांतील 135 वाड्या तहानलेल्या होत्या. त्यावेळी 15 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता.