Sat, Feb 23, 2019 11:06होमपेज › Konkan › सागराच्या कवेत विसावली चिमुरडी कासवे!

सागराच्या कवेत विसावली चिमुरडी कासवे!

Published On: Mar 20 2018 10:34PM | Last Updated: Mar 20 2018 10:34PMमंडणगड : प्रतिनिधी

मंडणगड तालुक्यातील वेळास येथील कासव संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून संरक्षित करण्यात आलेल्या ऑलीव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अंड्यातून 19 मार्च रोजी एकूण 79 पिल्ले सागराकडे झेपावली...आणि हा..हा म्हणता सागराने त्यांना आपल्या कवेतही घेतले.

कासवांचे गाव अशी ओळख असलेल्या वेळास येथे कासव महोत्सव फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, वातावरणातील बदलांमुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता.  त्यामुळे नुकतीच या महोत्सवास सुरुवात झाली आहे. यावर्षी वेळास येथे सर्वाधिक 18 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. या अठरा घरट्यांमध्ये 2124 अंडी संरक्षित करण्यात आली असल्याची माहिती हेमंत सालदूरकर यांनी दिली. 

गेल्या अनेक वर्षांपासून वेळास येथे ऑलिव्ह रिडले जातीची कासवे वेळास किनारी अंडी घालण्यासाठी येत आहेत. प्रथम गावचे तरूण या कासवांची अंडी हॅचरिजमध्ये संरक्षित करीत असत. त्यानंतर काही वर्षे सह्याद्री मित्र चिपळूण ही संस्था या कामामध्ये सहभागी झाली होती. सध्या वेळास गावचे कासव मित्र मंडळ स्वतः हे काम करीत आहेत. यामध्ये विजय सालदूरकर, प्रदीप महाडिक, सुरेंद्र पाटील, प्रमोद भाटकर, किशोर सावंत, नाना तोडणकर, नंदकिशोर पाटील, प्रीतम पाटील,  देवकर आदी कासवप्रेमी मेहनत घेत आहेत.

कासव महोत्सव पाहण्यासाठी मुंबई- पुण्यासह परदेशी पर्यटकांची वेळास गावी गर्दी होत आहे. 19 मार्च रोजी एकूण 79 पिल्ले सागराकडे झेपावली असून उर्वरित पिल्लेही अल्पावधीतच समुद्राच्या आपल्या अधिवासात जाणार असल्याचे हेमंत सालदूरकर यांनी सांगितले.