रत्नागिरी : प्रतिनिधी
देवरूख पंचायत समितीमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रूजली असून ठेकेदाराला सावरण्यासाठी पंचायत समितीच्या एका पदाधिकार्यासह अधिकार्यांनी कंबर कसल्याची चर्चा देवरूख पंचायत समितीमध्ये रंगू लागली आहे.
या घोटाळ्यासंदर्भात दै. पुढारीने आवाज उठवल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र बाजारभावापेक्षा अधिक किमतीने निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या जात आहेत. यामध्ये वॉटर कुलर, पथदीप, ब्लिचिंग पावडर आदी वस्तू खरेदी केल्या जातात. त्याचबरोबर रस्ता, पाखाडी, संरक्षण भिंतीचा खर्चही या वित्त आयोगांतर्गत केला जातो.
दरवर्षी लाखो रुपयांचा निधी या आयोगाच्या अंतर्गत ग्रामपंचायतींना मिळतो. या योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक उपकरणे संगणक वगैरे खरेदी केली जातात. संगणक खरेदी करताना तज्ज्ञ व्यक्तीकडून करणे आवश्यक आहे. मात्र संगणकाची तांत्रिक माहिती नसलेल्या याच ठेकेदाराकडून या वस्तूंची खरेदी केली जाते.
संगमेश्वर तालुक्यामध्ये सुमारे 80 टक्के वस्तूंची खरेदी ही एकाच ठेकेदाराकडून केली जात आहे. त्यामागे याच ठेकेदाराकडून खरेदी करा, असा अधिकार्यांनी फतवा काढल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात दै. पुढारीने आवाज उठवल्यानंतर अधिकार्यांकडून या ठेकेदाराची चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र या ठेकेदाराची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याऐवजी काही अधिकार्यांकडून या ठेकेदाराची पाठराखण केली जात आहे.
पंचायत समितीच्या एका वजनदार पदाधिकार्याने या ठेकेदाराला घोटाळ्यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा सध्या देवरूखमध्ये आहे. या पदाधिकार्याने ठेकेदाराकडून सावरण्याची लाखमोलाची बोलणी केली आहेत.
काही दिवसांपूर्वी संगमेश्वर जवळील एका ग्रामपंचायतीमध्ये 1 लाख 20 हजार रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत आवाज उठवल्यानंतर पंचायत समिती अधिकार्यांनी या ग्रामसेवकाला पैसे भरण्यास सांगितले. प्रत्यक्षात पंचायत समिती अधिकार्यांनी ग्रामसेवकावर घोटाळ्याप्रकरणी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र हे प्रकरण दडपले का गेले? असा प्रश्नही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
या वित्त आयोगातून शाळा व अंगणवाडीसाठी राखीव निधीची तरतूद आहे. त्याअंतर्गत शैक्षणिक साहित्य खरेदी केले जाते. मात्र खरेदी करण्यात आलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्याचबरोबर या वस्तू बाजारभावापेक्षा अधिक किमतीने खरेदी केलेल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तूंचा शासकीय दर निश्चित असताना या वस्तू अधिक दराने खरेदी का केल्या गेल्या? यासंदर्भात अधिकार्यांनी काय भूमिका घेतली? या सर्व गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत.
काही ठिकाणी खरेदीपेक्षा दुरूस्तीला अधिक खर्च दाखवल्याच्या घटना घडल्या आहेत. हा संपूर्ण शासकीय नियमांचा भंग आहे. मात्र ठेकेदार व काही अधिकार्यांची मैत्री अभंग असल्याने याची कोणालाच तमा नाही. त्यामुळे या प्रकरणातून अनेकांच्या अर्थपूर्ण संबंधांची चर्चा सुरू झाली आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी लक्ष घालावे. देवरूख पंचायत समितीमध्ये चौदाव्या वित्त आयोगांतर्गत वस्तू खरेदी घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी संगमेश्वर तालुकावासीयांमधून होत आहे.
भाजयुमोची कारवाईची मागणी
वस्तू खरेदी घोटाळा प्रकरणातील ठेकेदार, ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी संगमेश्वर तालुका भाजप युवा मोर्चाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात गेले चार वर्षे वस्तू खरेदीत घोटाळा होत असल्याचे स्पष्ट केले आहे.