Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Konkan › दिव्यांगांच्या क्रिकेटला मान्यतेसाठी प्रयत्न

दिव्यांगांच्या क्रिकेटला मान्यतेसाठी प्रयत्न

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:08PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

ऑल इंडिया क्रिकेट असो. फॉर द फिजिकल चॅलेंज्ड या संघटनेच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांच्या कालावधीत दिव्यांगांचे क्रिकेट देशव्यापी झाले आहे. देशातील बहुतांश राज्यांत दिव्यांगांच्या क्रिकेटचा प्रचार-प्रसार झाला आहे. प्रत्येक वर्षी जिल्हा, राज्य आणि विभागस्तरीय स्पर्धा होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिव्यांगांचे क्रिकेट झपाट्याने वाढत आहे. यामुळे भविष्यातील वाटचालीच्या द‍ृष्टीने दिव्यांगांच्या क्रिकेटला बीसीसीआयची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी कसोटीपटू व असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री अजित वाडेकर यांनी दिली. 

कोल्हापुरात 23 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत शाहूपुरी जीमखाना मैदानावर आयोजित दिव्यांगांच्या पश्‍चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी वाडेकर कोल्हापुरात आले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खा. धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर वाडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

वाडेकर म्हणाले, भारतातील 28 राज्यांत दिव्यांगांचे संघ तयार झाले आहेत. 40 टक्क्यांहून अधिक अपंग पुरुष खेळाडूंचे हे संघ आहेत. जिल्हा-राज्य-विभाग आणि राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही भारतीय दिव्यांग क्रिकेटपटूंनी आपली ओळख निर्माण केली आहे. सन 2015 च्या बांगलादेश स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला होता. पाकिस्तान व इंग्लंड येथे होणार्‍या स्पर्धेसाठीही या संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर भारतीय संघ त्यात सहभागी होणार असल्याचेही वाडेकर यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिकता काळाची गरज...

कोणत्याही खेळाच्या विकासासाठी त्याला व्यावसायिकतेची जोड देणे काळाची गरज आहे. आज लोकांकडे वेळेची कमतरता असल्याने झटपट होणार्‍या कमी वेळांच्या स्पर्धा संकल्पना रुजत आहेत. यामुळेच टी-20, आयपीएल यासारख्या क्रिकेट स्पर्धा लोकप्रिय झाल्या आहेत. कसोटी, वन-डेपेक्षा टी-20 मधून नवोदित खेळाडूंना खेळाच्या संधी आणि अनुभव तातडीने उपलब्ध होत आहे. खेळाडूंना आर्थिक पाठबळही उपलब्ध होत आहे. यामुळे खेळाडूंच्या मानसिक, शारीरिक तयारीसह करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.