रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील हातखंबा- गणपतीपुळे मार्गावर मासेबाव येथे ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी 11.35वा. च्या दरम्यान झाला.
या अपघातात सूर्यकांत मारुती जाधव (50, रा. चाफवली-संगमेश्वर) व रवींद्र बाबल्या धनावडे (43, रा. कारवांचीवाडी, पोमोंडी बुद्रुक, रत्नागिरी) हे दोघे ठार झाले. दोघेही होंडा शाईन (एमएच08-एए 8653) या दुचाकीवरून करबुडे येथून रत्नागिरीला चालले होते. त्याचवेळी एक ट्रक (एमएच 45- 1596) जयगडला चालला होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यात जाधव यांच्या डोक्याला मार लागला. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. तर रवींद्र धनावडे दुचाकी चालवत होते, त्यांच्या पायाला मार लागला होता. त्यांचे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन ती नाल्यात पडली होती. तर ट्रकही त्याच्या डाव्या बाजूला नाल्यात गेला होता. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. घटना घडताच लोकांची गर्दी जमली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची
हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. लोकांनी दोघांनाही रुग्णवाहिकेत ठेवले. त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी दोघांनाही मृत घोषित केले. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मात्र अल्पावधीतच वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा रत्नागिरी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक एस. एस. शेडगे तपास करीत आहेत.