Sun, Apr 21, 2019 13:53होमपेज › Konkan › रिफायनरीमुळे शेतकरी अडचणीत

रिफायनरीमुळे शेतकरी अडचणीत

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:58PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पासाठी नियोजित असलेल्या क्षेत्रातील जमिनींच्या सातबारा उतार्‍यांवर 32 (2) चे शिक्के मारण्यात आल्याने शेतकर्‍यांना शासकीय योजनेतून लागवड करणे, कर्ज उचल करताना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे याबाबत संबंधितांशी चर्चा करून शेतकर्‍यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र सैनिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील जठार यांनी प्रांताधिकारी अभय करगुटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या गावांतील तलाठी सज्जावर येत नसल्याने शेतकरी बागायतदार यांची गैरसोय होत असून तीदेखील दूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या 14 गावांमधील शेतकरी, बागायतदार यांच्या सातबारा उतार्‍यांवर 32 (2) चे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे या गावांतील शेतकरी व बागायतदारांची मोठी गैरसोय होत आहे. या शिक्क्यांमुळे चालू हंगामात शासकीय योजनेतून लागवड करण्यासाठी दाखल करण्यात येणारे प्रस्ताव नाकारण्यात येत आहेत. फलोद्यान म्हणून घोषित झालेल्या जिल्ह्याच्या द‍ृष्टीने हे अन्यायकारक व हानिकारक आहे. तसेच 32 (2) च्या शिक्क्यांमुळे शेतकरी, बागायतदारांना बँकेकडून पीक कर्ज मिळणेही मुश्किल होणार असल्याचे जठार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

बहुतांश बागायदार, शेतकरी दरवर्षी बँकांकडून पीककर्ज घेतात. मात्र या शिक्क्यांमुळे यावर्षी जुने पीककर्ज फेडल्यानंतर नवीन कर्ज वाटप करताना तांत्रिक मुद्यांवर बँका कर्ज नाकारण्याची शक्यता आहे. काही बँकांनी बोजा चढणार नाहीत अशी 1 लाख पर्यंतचीच कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच जर कर्जासाठी संबंधित विभागाचा ‘ना हरकत दाखला’ आणावयास सांगितले गेले तर तेही अन्यायकारक असणार आहे. त्यामुळे स्वतःची जमीन असूनही शेतकर्‍यांना कर्जापासून वंचित रहावे लागणार आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे जठार यांनी नमूद केले आहे.

संबंधित विभागांना सूचना द्या : जठार

पीककर्जासाठी संबंधित सातबारा, आठ अ, फेरफार सारखी महसुली कागदपत्रे आवश्यक असतात. त्यातच संगणीकृत सातबारा उतार्‍यांवर पीकपाणी नमूद असतेच असे नाही, अशावेळी ती हस्तलिखित स्वरूपात नोंद करून घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित तलाठी हे सज्जावर असणे आवश्यक आहे. मात्र, सर्व तलाठी राजापूर तहसील कार्यालयात असल्याने सर्वसामान्य शेतकरी, बागायतदार यांच्या दृष्टीने ते आर्थिकदृष्ट्या गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित तलाठी, बँका तसेच भूसंपादन विभाग आदींना तातडीने योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी जठार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.