Fri, Apr 19, 2019 12:42होमपेज › Konkan › चिकट मातीअभावी गणेश मूर्तिकार अडचणीत!

चिकट मातीअभावी गणेश मूर्तिकार अडचणीत!

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 8:48PMसावंतवाडी : रजत सावंत

जमीन नापीक बनत असल्याच्या भीतीने सिंधुदुर्गातील माती विक्रेत्यांनी चिकट माती देण्यास नकारघंटा दिल्याने गोव्याहून माती आणण्याची नामुष्की गणेशमूर्तिकारांवर ओढवली आहे. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मूर्ती बनविण्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.  मात्र, अशी स्थिती राहिल्यास पुढील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचा पर्याय स्वीकारावा लागेल. परिणामी पारंपरिक मूर्ती कला संपुष्टात येईलच परंतु स्थानिकांना मिळणारा हंगामी रोजगारही बुडेल, अशी भीती ओटवणे येथील पिढ्यानपिढ्या मूर्ती कला जोपासणार्‍या गावकर कुटुंबीयांनी व्यक्‍त केली.

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील विठ्ठल बाबली गावकर यांनी तेथे गणेशमुर्ती शाळा सुरू केली. त्यांचा हा वारसा त्यांचा मुलगा रघुनाथ गावकर, दत्ताराम गावकर त्यांचा नातू समीर गावकर, सचिन गावकर हे पुढे चालवित आहेत. सध्या त्यांच्या मूर्ती शाळेत 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यांच्या मुर्त्यांना ओटवणे परिसरासह कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी तसेच गोवा राज्यातही मोठी मागणी आहे. यावर्षी या कुटुंबियांना गणपती बनविण्यासाठी लागणार्‍या चिकटमातीची समस्या भेडसावली. याविषयी त्यांनी आपली खंत व्यक्‍त केली. ते म्हणाले, आम्ही दरवर्षी स्थानिकांकडून माती आणायचो. मात्र, अलिकडील काही वर्षात मातीची समस्या निर्माण झाली. जमीन नापीक होत असल्याच्या कारणाने स्थानिक माती विक्रेत्यांनी मातीविक्रीचा व्यवसाय कमी केला आहे.त्यामुळे गोव्यातून माती आणावी लागते. शहरांमध्ये पीओपीची मागणी वाढल्याने गावाकडच्या मूर्तीशाळांकडे मातीच्या मूर्तीची मागणी केली आहे. मात्र, माती उपलब्ध होत नसल्याने मूर्तीची संख्या वाढवणे ही कठीण झाले आहे.यावर्षी महागाईमुळे मूर्त्यांच्या दरात वाढ होणार आहे.

पीओपीमुळे पारंपरिक कारागिरात धास्ती

पीओपी मूर्ती स्वस्त मिळत असल्याने मातीच्या मूर्तीची मागणी कमी होत आहे. त्यामुळे कामगारांची मजुरी परवडत नाही त्यात करून कामगारांचा तुटवडा आहे. पीओपी मुळे तर पारंपरिक कारागिरांची कलाही धोक्यात आली आहे.