Wed, Feb 20, 2019 17:30होमपेज › Konkan › ट्रॉलिंग, गिलनेट मासेमारी आजपासून

ट्रॉलिंग, गिलनेट मासेमारी आजपासून

Published On: Jul 31 2018 10:34PM | Last Updated: Jul 31 2018 10:31PM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

ट्रॉलिंग आणि गिलनेट नौकांची मासेमारी बुधवारपासून सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील बंदरे गजबजणार आहेत. 1 जूनपासून पावसाळी मासेमारीबंदी सुरू झाल्यापासून बंदरांवर शुकशुकाट होता. सर्व मच्छीमार बोटी बंदरांमध्ये शाकारलेल्या होत्या. पर्ससीन नेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या सुमारे 3 हजार मच्छीमार नौका आहेत. त्यामध्ये ट्रॉलिंग आणि गिलनेटने मासेमारी करणार्‍या सुमारे दीड ते पावणेदोन हजार नौका आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या पावसाळी मासेमारीबंदीमुळे बंदरांवरच स्थिरावलेल्या होत्या. 1 ऑगस्टपासून ट्रॉलिंग आणि गिलनेट मच्छीमार नौकांची पावसाळी बंदी बुधवारपासून उठत आहे.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत 1 ऑगस्टपासून सर्वच प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी जात होत्या. त्यापूर्वी काहीवर्षे अगोदर 15 ऑगस्टपासून मासेमारी सुरू व्हायची. फेब्रुवारी 2016 च्या अधिसूचनेनुसार पर्ससीन नेट नौकांना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंतच मासेमारीची परवानगी आहे.

पर्ससीन नेट मच्छीमार बोेटींना पूर्वीप्रमाणे 15 ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीसाठी परवानगी मिळेल, अशी आशा बाळगली जात आहे. त्यानुसार पर्ससीन नेट नौका मालक 15 दिवस तरी वाढवून मिळतील, या आशेवर आहेत. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली आहे.