होमपेज › Konkan › कोकणच्या विकासाची त्रिसूत्री

कोकणच्या विकासाची त्रिसूत्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभू यांचा समावेश झालाच शिवाय थेट जनतेशी संपर्क असलेल्या रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. खांद्यावर पडलेल्या कोणत्याही जबाबदारीचा, कामाचा योग्य अभ्यास करून ती पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन आणि त्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची सुरेश प्रभू यांची पूर्वीपासूनच कामाची पद्धत आहे. याच नियोजनबद्धतेचा उपयोग रेल्वे मंत्रालयाला झाला आणि अवघ्या सहा महिन्यांत रेल्वे मंत्रालय थेट सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले. देशातील एक प्रभावी खाते चालवताना मेट्रोचे जाळे हा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला. खाते लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा सर्वोत्तम वापर करताना तुमच्या तक्रारी थेट आमच्याकडेच पोहोचवा, असे सांगत स्वत:चे आणि रेल्वेचे ट्विटर खाते सुरू केले. त्याला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. 

कोकण रेल्वे अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आणि सातत्याने त्याबाबत त्यांनी प्रयत्न केले. प्रभू यांच्या कार्यकाळातच खर्‍या अर्थाने कोकण रेल्वेला न्याय मिळाला. रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण, नवनवी स्थानके, स्थानकांचे अद्ययावतीकरण, फिरते जीने, वेगवान तेजस रेल्वे, कोकणचे प्रसिद्ध कवी केशवसूत यांच्या कवितेवरून नामकरण केलेली तुतारी एक्सप्रेस, महिला बचत गटांच्या पदार्थांना रेल्वेमध्ये दिलेली संधी, चिपळूण- कराड रेल्वेमार्ग, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वेमार्गासह लोटे येथील रेल्वेचा कारखाना आदी अनेक बाबी ना. प्रभू यांनी कोकणवासीयांसाठी केल्या. तर मानव संसाधन संस्थेच्या माध्यमातून परिवर्तन केंद्र सुरू करून त्याद्वारे त्यांनी येथील 40 हजार महिलांना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी सज्ज केले आहे.

रेल्वे मंत्रालयानंतर प्रभू यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वाणिज्य व उद्योग मंत्रालय तसेच केंद्रीय हवाई परिवहन मंत्रालयाचीही जबाबदारी सोपविली आहे. ही खाती प्रभावीपणे कार्यक्षम करतानाच त्यांचा उपयोग आपल्या कोकणाच्या विकासासाठी करण्यासाठी आता ना. प्रभू सज्ज झाले आहेत. याचसाठी कोकणामध्ये मत्स्य, कृषी आणि पर्यटनामध्ये क्रांती घडवण्याच्या द‍ृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहेत. ना. सुरेश प्रभू रविवार दि. 1 एप्रिल रोजी रत्नागिरीत राऊंड टेबल कॉन्फरन्स घेत आहेत. त्याचवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील चिपी विमानतळाची पाहणी करून येथील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.

कोकणाचा विकास करण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत. चिपी विमानतळाचे भूमिपूजन ना. सुरेश प्रभू आणि खा. नारायण राणे यांच्याच हस्ते झाले आहे. मात्र, कोकणात आणि कोकणासाठी झालेल्या अनेक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये ठोस निर्णयप्रक्रिया झालेली दिसून येत नाही. त्यामुळेच अद्यापही कोकण विकास रखडलेला आहे. मात्र, या विकास प्रक्रियेला ना. प्रभू नियोजनबद्धतेची चौकट घालणार आहेत. बेरोजगारी ही येथील मुख्य समस्या आहे. त्यामुळे येथील तरूण-तरूणी मोठ्या संख्येने मुंबईसारख्या महानगराकडे धाव घेत आहेत. गावे ओस पडली असून रोजगाराच्या नावाखाली येथील तरूण स्वत:ची हुशारी आणि कार्यक्षमता अन्यत्र पणाला लावत आहेत. याच समस्येवर उपाय शोधताना कोकणात मत्स्य, कृषी आणि पर्यटनाची त्रिसूत्री राबवून येथील युवा शक्‍तीला येथेच रोजगार देण्याचा आणि येथून गेलेल्या युवकांना पुन्हा आपल्या गावाकडे माघारी बोलवण्याची ना. प्रभू यांची इच्छा आहे.

कोकणाचा निसर्ग वेगळा आहे. एकीकडे सह्याद्रीच्या रांगा तर दुसरीकडे अथांग समुद्र यामध्ये असलेल्या कोकणातील प्रत्येक गोष्ट अनोखी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आहे. मात्र, येथील पारंपरिक शेती आणि मच्छी व्यवसाय कमी होत आहे. रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. अशावेळी नवे पर्याय निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणर आहेत. त्यामध्ये मत्स्यपालनावर भर देताना तामिळनाडू, आंध्रप्रदेशप्रमाणे मत्स्य क्षेत्रात क्रांती करण्याची ना. प्रभू यांची इच्छा आहे. येथील मासे, जिताडा, खेकडा, गोड्या पाण्यातील मासळी, शोभिवंत मासळी, खाडी किनारे, समुद्र किनारे, पडिक खारभूमी यातून येथील युवकांना रोजगार निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

कोकणात आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. ते गणपतीपुळे, तारकर्ली, दापोलीसारख्या ठिकाणांना भेट देतात. मात्र, अशा ठिकाणी पायाभूत सुुविधा निर्माण व्हाव्या, केरळप्रमाणे या पर्यटन स्थळांची जगभर प्रसिद्धी व्हावी, येथील ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, अ‍ॅडव्हेंचर पर्यटन विकसित करताना स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ना. प्रभू यांचे प्रयत्न राहणार आहेत. त्याशिवाय कोकणात येणार्‍या परदेशी पर्यटकाला थेट कोकणात येता यावे, यासाठी सिंधुदुर्गातील चिपी आणि रत्नागिरी विमानतळाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. देवगड आंबा, हापूस आंबा आणि काजूची निर्यात परदेशी होताना येथे माशांसह आंबा-काजूचे एक्स्पोर्ट हब व्हावे, हाही त्यांचा मानस आहे. 

यासाठीच रविवारी 1 एप्रिलला होणारा ना. सुरेश प्रभू यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणार्‍या या बैठकीतूनच ते सन 2030 च्या कोकणाचा मत्स्य, कृषी आणि पर्यटनाचा आराखडा मांडणार असून त्यातूनच कोकण विकासाची एक नवी क्रांती घडणार आहे. या तीन क्षेत्रातील तळागाळातील माणूस, येथील युवक या विकास प्रक्रियेशी जोडला जावा, यासाठी ना. प्रभू यांचा प्रयत्न राहणार आहे. कोकण रेल्वेला प्रभावी करून ना. प्रभू यांनी कोकण विकासाला वेग दिला आहे. आता वाणिज्य व उद्योग तसेच हवाई परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून विकास प्रक्रिया सुरू व्हावी, येथील खेडी ग्लोबल व्हावी, यासाठी ना. प्रभू प्रयत्नशील आहेत.

Tags : Konkan, Konkan News, Trisutri,  Konkan, development


  •