होमपेज › Konkan › कोंढेतील ट्रान्स्फॉर्मरचे खांब धोकादायक

कोंढेतील ट्रान्स्फॉर्मरचे खांब धोकादायक

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 9:41PM

बुकमार्क करा
दापोली : प्रतिनिधी

तालुक्यातील कोंढे गोरिवलेवाडी येथे विद्युत ट्रान्स्फॉर्मरच्या शंभर फुटालगत शॉर्टसर्किटमुळे वणवा लागल्याची घटना घडली आहे. मात्र, येथील गवळवाडी आणि गोरिवलेवाडी या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वणवा नियंत्रणात आणण्यात आला. हा धोकादायक ट्रान्स्फॉर्मर आणि त्याचे खांब बदलण्याची मागणी होत आहे.

कोंढे  गोरिवलेवाडी आणि गवळवाडी या दोन वाड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी जि.प.शाळा क्र.2 या शाळेच्या लगत विद्युत ट्रान्स्फॉर्मर आहे. या ट्रान्स्फॉर्मरवरुन येथील दोन वाड्यांना वीजपुरवठा होतो. मात्र, या विद्युत ट्रान्स्फॉर्मरवरुन गेलेल्या वीज वायर या एकमेकाला कायम चिकटत असून वारंवार या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. 
मागील पावसामध्ये गोरिवलेवाडीमध्ये अनेकांच्या घरांना विजेचा धक्‍का बसला होता. या ठिकाणी असणार्‍या ट्रान्स्फॉर्मरचे वीज खांब गंजले असून वितरण कंपनीने एक वर्षानंतर मागणी करुन या ठिकाणी वीज खांब बसवले आहेत. मात्र, ट्रान्स्फॉर्मर बदलण्याचे नाव कंपनी अधिकारी घेत नाहीत.  तालुक्यामध्ये वीजवितरण कंपनीकडून कामे सुरु असून कंपनी खासगी कामामध्ये अधिक रस घेताना दिसत आहे. कोंढेतील गंजलेले खांब बदलावेत म्हणून येथील ग्रामस्थ वारंवार वीज वितरण कंपनीच्या पायर्‍या झिजवित आहेत. मात्र, कंपनीचे अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

गतवर्षी कोंढेमध्ये वीज वायर तुटून जनावरे दगावलेली होती. त्यावेळेस वितरण कंपनीकडून थातुरमातूर दुरुस्तीकरुन वेळ मारुन नेली गेली होती. कोंढे गोरिवलेवाढी येथील ट्रान्स्फॉर्मर आणि हाताला लागत असलेल्या वीज वायर याची दुरुस्ती न केल्यास एक दिवस मोठी आपत्ती येऊन येथील लोकांना मोठे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. तरी वितरण कंपनीने जागे होऊन कोंढेतील वीज समस्या दूर करावी, अशी मागणी आहे.