होमपेज › Konkan › प्राथमिक शिक्षकांच्या आठवडाभरात बदल्या

प्राथमिक शिक्षकांच्या आठवडाभरात बदल्या

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:06AMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, येत्या आठवडाभरात याबाबतचे मेमो निघण्याची शक्यता आहे. अवघड (दुर्गम) अणि सोयीचे (सुगम) क्षेत्र ठरवताना झालेल्या गोंधळामुळे शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण होतेे. त्यामुळे या बदल्यांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. अनेक वर्षे दुर्गम भागात सेवा बजावणार्‍या शिक्षकांचा याचा लाभ होणार आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार असल्याची घोषणा राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. यापूर्वी ‘मॅन्युअली’ बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्याचा वरदहस्त असेल त्या शिक्षकांनाच लाभ होत असे. काही शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गम भागात सेवा बजावत आहेत, तरीही त्यांची बदली झालेली नाही, अशा शिक्षकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. अपंग, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रीकरण हवं असलेल्यांनासुद्धा या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासनाकडून प्रत्यक्षात या निर्णयाच्या अंमलबजावणीलादेखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीत होणार्‍या गैरप्रकारांना आता चाप बसणार आहे .

बदल्यांची प्रक्रिया राबवताना अवघड क्षेत्राच्या ठिकाणी प्राधान्याने शिक्षक उपलब्ध करून देताना जिल्ह्यातील अवघड क्षेत्र आणि सोयीचे क्षेत्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अवघड शाळांची यादी तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले. पहिल्या यादीत 729 शाळा दुर्गम भागात दाखवण्यात आल्या. मात्र, याववर हरकती आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नव्याने यादी तयार करताना 923 शाळा अवघड क्षेत्रात समाविष्ट केल्या आहेत.

नवीन बदली धोरणाबाबत सुगम व अवघड क्षेत्र यामध्ये 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन आदेशान्वये अवघड क्षेत्र ठरवताना तालुक्यापासूनचे अंतर हा निकष धरला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. प्रशासनाने तयार केलेली यादी सदोष असल्याने त्यात बदल करण्यासाठी प्रशासनाला संधी देण्यात यावी, अशी मागणी कोकण आयुक्‍तांकडे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, कास्ट्राईब संघटना, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने करण्यात आली होती.