Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › महामार्ग पाच तास ठप्प

महामार्ग पाच तास ठप्प

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:30PMकणकवली ः वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-टेंबवाडी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर  गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे रात्री दोन वा.पासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातील जेसीबीद्धारे झाड बाजूला केले. अखेर सकाळी  सात तासाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती. 

कोसळलेले हे झाड गुरुवारी पहाटे वागदेचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर व सामाजिक कार्यकर्ते उमेश घाडीगावकर यांच्या निदर्शनास  आले. त्यांनी चौपदरीकरण ठेकेदार कंपनी कार्यालयात तसेच पोलिसांशी  संपर्क साधला. दरम्यान, महामार्गावरील वाहनांची रांग वाढत होती. मात्र, ठेकेदार कंपनी अथवा आपत्कालीन यंत्रणेकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनीच्या ओसरगाव येथील कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर कंपनीकडून जेसीबी वागदे येथे पाठविण्यात आला. जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजूला करण्याचे काम सकाळी 8.30 वा. सुरू करण्यात आले. झाड बाजूला करण्यासाठी 2 तासांचा कालावधी लागला. याचदरम्यान ओरोस येथे जाणार्‍या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात आली. आपत्कालीन यंत्रणा संपर्क साधूनही वेळीच उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली.