Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Konkan › 1001 बेशिस्त वाहनचालकांना 3 लाखांचा दंड 

1001 बेशिस्त वाहनचालकांना 3 लाखांचा दंड 

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 11:01PM मालवण : प्रतिनिधी

 वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्हा वाहतूक कर्मचार्‍यांना वाहतूक नियमांची जिल्ह्यात सर्वत्र कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देष दिले आहेत.  यानुसार मालवण शहरातील  पथकाने नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात तब्बल 3 लाख रुपयांची दंडात्मक रक्‍कम वाहनचालकांकडून वसूल केली आहे. तसेच 17 मद्यपी वाहनचालकांना थेट न्यायालयात हजर केले.   पथकाने राबविलेल्या धडक कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस. बी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उन्मेष पेडणेकर, शेखर मुणगेकर, बाबूराव राठोड, उमेश थाळेकर, स्नेहल राणे यांनी ही कारवाई केली.  जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात 1001 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यात ऑन दि स्पॉट 2 लाख 23 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला. न्यायालयात पाठविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून 51 हजार 600 रुपयांचा दंड वाहन चालकांना करण्यात आला आहे. 

 वाहन चालविण्याचा परवाना आणि कागदपत्रे गाडीसोबत नसलेले मोठ्या प्रमाणात वाहनचालक सापडून आले. यात परवाना सोबत नसणार्‍या 271 वाहन चालकांकडून 55 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कागदपत्रे सोबत नसणार्‍या 249 वाहन चालकांकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुचाकी असूनही परवाना नसलेल्या 40 जणांकडून 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. वन वे गाडी चालविल्याबद्दल 76 जणांकडून 15 हजार 200 रुपये दंड, गणवेश नसल्याबद्दल 6 जणांना 1200 रुपये दंड, ट्रिपल सीट गाडी चालविल्याबद्दल 63 जणांकडून 12 हजार 600 रुपये दंड, क्लीनर नसल्याने 54 जणांकडून 10 हजार 800 रुपये दंड, इन्शुरन्स नसलेल्या 70 जणांकडून 18 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गाडी चालवीत असताना मोबाईलवर संभाषण केल्याप्रकरणी प्रथमच या तीन महिन्यात 70 वाहन चालकांवर 14 हजार 200रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  धूमस्वारांवरही कारवाई करण्यात आली आहे.  शहरात बुलेटचे सायलन्सर बदलून धूमस्टाईलने बुलेट चालविण्याचे प्रकार सुरू झालेले असल्याने लवकरच शहरातील विविध ठिकाणी अचानकपणे तपासणी मोहीम राबवून बुलेटचे सायलन्सरची तपासणी केली जाणार आहे. 

गाडीत बदल केल्यास त्याची परवानगी आवश्यक असते, यामुळे अशा बुलेटस्वारांवर कारवाई केली जाणार असल्याचेही वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले. दारू पिऊन गाडी चालविल्याप्रकरणी 17 वाहन चालकांवर 41 हजार 600 रुपयांचा दंड न्यायालयाकडून करण्यात आला आहे. तसेच विना परवाना माल वाहतूक केल्याप्रकरणी दोन प्रकरणात 7000 रुपये दंड, फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने एका वाहन चालकाला 2000 रुपये दंड, इन्शुरन्स नसल्याने दोन प्रकरणात एक हजार रुपयांचा दंड न्यायालयाने केला आहे.

Tags : Traffic Rules, Penalty, Vehicle,  Malavan, Ratnagiri