Mon, Jun 17, 2019 15:19होमपेज › Konkan › सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी गंभीर

सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी गंभीर

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 10:43PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

सावंतवाडी शहरातील  वर्दळीच्या  रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने रस्तेच ब्लॉक होत असल्याची स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शुक्रवारीही असेच चित्र दिसून आले. संचयनी रोड येथे वाहतूक कोंडी दरम्यान वाहनांना बाजू देताना एक कार गटारात कलंडली.

सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. पालिका प्रशासनाने पार्किंगचे नियोजन व नो पार्किंगचे बोर्ड लावूनही पार्किंगची समस्या उद्भवत आहे.शिवाजी चौक, गांधी चौक, संचयनी रोड, सबनिसवाड़ा, मिलाग्रिस रोड-सालईवाडा, कॉलेज रोडसह शहराच्या बहुतांश भागात ट्रॉफिक जाममुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. शहरातील नागरीकरण वाढत असताना  रस्ते मात्र आक्रसले आहेत. शहरात काही ठिकाणी पालिकेने रस्त्यावर नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. मात्र, ‘नो पार्किंग’सह रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्याची सवय वाहनचालकांना जडल्याने शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
 


 

खरेदी व अन्य कामकाजासाठी शहरात येणार्‍या ग्राहकांच्या वाहनाची संख्या जास्त असल्याने शॉपिंग व इतर इमारत परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणार्‍या वाहनांची जबाबदारी नेमकी कुणाची? असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यावर पार्किंग करण्याची फॅशन सुरू झाल्याचा आरोप अन्य वाहनचालकांकडून केला जात आहे. याकडे पालिका व वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. 

शहरात पालिकेकडून पार्किंग व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.  तरीही वाहतूक कोंडी होत असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. काही काळापूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यावर शिस्तबद्ध वाहने पार्क केली जात होती. परंतु, काही दिवसांनी पुन्हा रस्त्यावरच वाहने पार्क केली जात असल्याने त्याचा त्रास अन्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात येत असल्याने वारंवार खोळंबा होऊनही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे. शहरात  नेहमीच रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने इतरांना त्रास सहन करावा लागतो. याप्रश्‍नी ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Tags:  Traffic, Traffic Problem,Sawantwadi City