Wed, Aug 21, 2019 01:54होमपेज › Konkan › कुडाळातील वाहतूक कोंडी वाढतेय!

कुडाळातील वाहतूक कोंडी वाढतेय!

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:16PMकुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. ही कोंडी  सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या अपुरीच आहे. शिवाय न.पं.ची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल्याने शहरातून मुख्य रस्त्याचा श्‍वास गुदमरलेलाच आहे.त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी व नागरिकांमधून प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर आळविला जात आहे. कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दैनंदिन असून, हा प्रश्‍न  सोडवण्यास पोलिसख महसूल तसेच न. पं.  प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. वाहतूक कोंडी दररोजची होत असताना सध्या  मुंबईकर चाकरमान्यांच्या वाहनांचीही त्यात भर पडली आहे. पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक-गांधीचौक ते डॉ. आंबेडकर पुतळा या दरम्यान बुधवारी आठवडा बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत  आहे. शिवाय  इतर दिवशीही ही समस्या उद्भवत आहे. रस्ता दुतर्फा अतिक्रमण, विनाकारण पार्क केली जाणारी वाहने या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. 

दिवसेंदिवस वाढत जाणारी ही समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिस बळही अपुरेच आहे. शहरात केवळ दोनच वाहतूक पोलिस कर्मचारी पोस्ट ऑफिस  व गांधी चौक परिसरात कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र त्यांचीही मोठी दमछाक होत असून पोलिस प्रशासनाचेही प्रयत्न अपुरेच ठरत आहेत. कुडाळ न.पं. प्रशासनाचीही अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी काही महिन्यापूर्वी बाजारपेठ व त्यानंतर कुडाळ हायस्कूल ते जिजामाता चौकपर्यंत बेधडकपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य रस्त्याने मोकळा श्‍वास घ्यावा जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटावा हा त्यामागील हेतू होता. मात्र उर्वरीत  जिजामाता  चौक ते डॉ. आंबेडकरनगर दरम्यानचे अतिक्रमण हटवण्यास  न.पं. प्रशासन वेळकाढू  धोरण अवलंबत असल्याने याच दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. याकडे कुडाळ नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल कुडाळवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.