Sat, Mar 23, 2019 02:47होमपेज › Konkan › रत्नागिरीत पारंपरिक मच्छीमारांचा एल्गार 

रत्नागिरीत पारंपरिक मच्छीमारांचा एल्गार 

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:30PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

बेकायदेशीर मासेमारी विरोधात गुरुवारी पारंपरिक मच्छीमार्‍यांनी एल्गार पुकारला. जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको करणार्‍या पारंपरिक मच्छीमारांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलक मच्छीमारांना अवघी पाच ते सात मिनिटेच रास्ता रोको करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या या आंदोलनाला मंडणगड, दापोली, हर्णैतून चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी 2 वाजता रास्ता रोको सुरू झाले. त्यानंतर लगेचच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मच्छीमार कृती समितीचे नेते खलील वस्ता यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. गोगटे कॉलेज मार्ग येथे सर्व पारंपरिक मच्छीमार एकत्र आले. येथून दुपारी 12.30 वाजता मोर्चा सुरू झाला. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, मच्छीमार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा सुरू झाल्या. दुपारी 1.45 वाजता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. येथे घोषणा झाल्या. नेत्यांची भाषणे झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यादरम्यान येथील वाहतूक सुरळीत राहील, असे पोलिसांनी नियोजन केले होते. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्त्याच्या मधोमध येऊन रास्ता रोको केले. पोलिसांच्या 4 पिंजरा व्हॅनमध्ये पाठवून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.