होमपेज › Konkan › रिक्षातील प्रवाशांकडून पर्यटन कर आकारणी

रिक्षातील प्रवाशांकडून पर्यटन कर आकारणी

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 9:05PMमालवण : वार्ताहर 

मालवण ते तारकर्ली जाणार्‍या रिक्षातील प्रवाशांकडून पर्यटन कर आकारल्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर रिक्षात स्थानिक प्रवासी असल्यास कर आकारणी केली जाणार नाही. यात रिक्षा व्यावसायिकांनीही सहकार्याची भूमिका स्वीकारावी, अशी तारकर्ली ग्रामपंचायत व रिक्षा व्यावसायिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने या वादावर पडदा पडला. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी व नगरसेवक यतीन खोत यांनी यासाठी मध्यस्थी केली.

तारकर्ली, देवबाग गावात जाणार्‍या रिक्षातील प्रवाशांकडून रविवारपासून पर्यटन कर आकारणी सुरू करण्यात आली. याला शहरातील रिक्षा व्यावसायिकांनी याला आक्षेप घेतला. यावर पर्यटन कर वसूल करणार्‍या संबंधित संस्थेने शहरातील रिक्षा व्यावसायिकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर  या रिक्षा चालकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. यावेळी बीट अंमलदार सुनील वेंगुर्लेकर, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर, पर्यटन संस्थेचे श्री. कुबल, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत तसेच शहरातील भरड नाक्यांवरील रिक्षा व्यावसायिक  उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या चर्चेत संबंधित रिक्षा व्यावसायिकांनी रविवारपासून तारकर्ली येथे प्रवाशांकडून अचानक पर्यटन कर आकारणी सुरू करण्यात आली.  हा कर कधीपासून सुरू करण्यात आला? अशी विचारणा केली. यावर पर्यटन संस्थेच्या कर्मचार्‍यांनी 1 जानेवारीपासून पर्यटकांकडून कर आकारणी केली जात असल्याचे सांगितले. यानंतर संबंधित संस्थेचे पदाधिकारी श्री. कुबल, डॉ. केरकर हे घटनास्थळी आले असता, अन्य रिक्षा व्यावसायिकाबरोबर झालेल्या चर्चेत संबंधित रिक्षा व्यावसायिकाने याची माहिती सर्व रिक्षा व्यावसायिकांना आपण देऊ, असे सांगितले होते. यावरून पोलिस ठाण्यात आपल्याविरोधात धमकी दिल्याची दिलेली तक्रार खोटी असल्याचे रिक्षा व्यावसायिकाने सांगितले. यावर रिक्षातून पर्यटकही तारकर्ली, देवबाग गावात जात असल्याने त्यांच्याकडून कराची आकारणी ही शासनाच्या निर्देशानुसार केली जाणार असल्याचे तारकर्ली ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच केरकर यांनी स्पष्ट केले. रिक्षातील प्रवासी हा पर्यटकच आहे हे कसे ओळखणार अशी विचारणा करण्यात आली. यात संबंधितांकडून आधारकार्ड तपासले जाईल, असे सांगण्यात आले. यावर सर्वजण आधारकार्ड घेऊन प्रवास करत नसल्याचे सांगून हे चुकीचे असल्याचे रिक्षा व्यावसायिकांनी सांगितले. अखेर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत यांनी मध्यस्थी करताना रिक्षा व्यावसायिक जर स्थानिक प्रवाशांना घेऊन तारकर्ली, देवबाग येथे भाड्यासाठी जात असतील तर त्यांनी पर्यटन कर आकारणीच्या ठिकाणी संबंधित कर्मचार्‍याला सांगावे, अशा प्रवाशांकडून पर्यटन कर आकारला जाणार नाही, असे सांगितले. यावर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच स्नेहा केरकर यांनीही रिक्षातून पर्यटक प्रवास करत असतील तर त्यांच्याकडून पर्यटन कर घेतला जाईल अन्य प्रवाशांकडून कर आकारणी होणार नाही. मात्र, यात रिक्षा व्यावसायिकांनीही आम्हाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अखेर तारकर्ली ग्रामपंचायत व रिक्षा व्यावसायिकांनी सामंजस्याने सहकार्याची भूमिका घेतल्याने या वादावर पडदा पडला.