Tue, Jul 07, 2020 08:56होमपेज › Konkan › पर्यटन व्यावसायिकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पर्यटन व्यावसायिकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: Jun 18 2019 1:34AM | Last Updated: Jun 18 2019 1:34AM
मालवण : प्रतिनिधी

कोकणातील पर्यटन व्यावसायिकांवर आजपर्यंत अन्याय झाला असून सीआरझेड कायद्यासह अनेक प्रश्‍न व्यावसायिकांना भेडसावत आहेत. म्हणूनच आपल्या न्याय हक्‍कांसाठी कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना समृद्ध कोकण संघटनेमार्फत संघटित करण्यात येत आहे. आमच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन पुकारले असून याचा एक भाग म्हणून मंगळवार 18 जून रोजी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच पर्यटन व्यवसायिकांच्या विविध मागण्यांसाठी 25 जून रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योजक डॉ. दीपक परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी डॉ. दीपक परब हे बोलत होते. समृद्ध कोकण संघटनेचे तालुका संघटक अविनाश सामंत, बाबा मोंडकर, मंदार केणी, घनश्याम झाड आदी उपस्थित होते. किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकानी केलेली बांधकामे शासनाने सीआरझेड  अंतर्गत अनधिकृत  ठरवून ती तोडण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. ही कारवाई रोखण्यासाठी व अन्य पर्यटन विषयक प्रश्‍नांबाबत महाराष्ट्र शासनाकडे दाद मागण्यासाठी जन आंदोलनाची गरज आहे. तालुक्यातील किनारपट्टी भागातील नागरिक गेली अनेक वर्ष पर्यटन उद्योगात आहेत. मात्र शासन येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांसाठी कायमच उदासीन राहिले आहे. म्हणूनच हे आंदोलन पुकारले आहे. यासाठी किनारपट्टीवरील पर्यटन गावांनुसार प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे  अविनाश सामंत यांनी सांगितले.

पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्‍नांसाठी संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकण संघटनेतर्फे लढा पुकारला आहे. आज रत्नागिरी मधून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. हा लढा कोणा एका विरोधात नाही. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला जाग आणून देणे गरजेचे आहे. अनेक वेळा सरकारचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाल्याने आता सरकार व्यावसायिकांच्या आत्महत्येची वाट बघत आहे का? असा सवाल डॉ. दीपक परब यांनी केला. 2019 पर्यंतची सर्व पर्यटन बांधकामे अधिकृत करणे, स्वतंत्र कोकण पर्यटन प्राधिकरण निर्माण करणे, पर्यटन उद्योगाला भरघोस आर्थिक सहाय मिळविणे, भूमिपुत्राना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या मिळणे आदी पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्या आहेत. यासाठी समृद्ध कोकण संघटनेच्यावतीने कोकण रोजगार हक्‍क अभियान राबविण्यात येत आहे. 18 जूनला दुपारी 2 वा. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर ओरोस ते मालवण, तारकर्ली, देवबाग अशी भव्य कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत सिंधुदुर्ग रोजगार हक्‍क परिषद मालवण समुद्र किनारी होणार आहे. तसेच 19 रोजी रायगड येथे, 20 रोजी पालघर येथेही आंदोलन करण्यात येणार आहे, असेही डॉ. परब यांनी सांगितले.