Wed, Apr 24, 2019 20:00होमपेज › Konkan › बोरज धरण क्षेत्रात पर्यटन विकास शक्य

बोरज धरण क्षेत्रात पर्यटन विकास शक्य

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 8:59PMखेड : वार्ताहर

तालुक्यात ब्रिटिशकाळात बोरज येथील पाखाडीच्या पर्‍यावर सन 1938 मध्ये धरण बांधण्यात आले. खेड शहराला गुरूत्वीय बलाने (ग्रॅव्हिटी) पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी निसर्गरम्य बोरज भागात हे धरण बांधले. निसर्गसौंदर्य लाभलेल्या या धरण क्षेत्रात पर्यटन विकास होऊ शकतो व त्याद‍ृष्टीने योजना आखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

खेड तालुक्यात बोरज या ठिकाणी सन 1938 मध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पाखाडीच्या ओढ्यावर दगडी बंधारा बांधून पाणी अडवले. या ठिकाणी पाणीसाठा करण्याचा निर्णय तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतला होता. विकसित होत असलेले खेड शहर व त्याच्या भविष्यकालीन लोकसंख्या वाढीचा विचार त्यावेळी करण्यात आला.

बोरज धरणातून खेड शहरापर्यंत सुमारे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार करून गुरूत्वीय बलाने खेड शहरात पाणी पाईपने येईल, अशी रचना या धरणाची आहे. गुरूत्वीय बलाने बोरज धरणाचे पाणी खेड शहरात येत असल्याने त्यासाठी विजेचा वापर होत नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत या धरणाचे महत्त्व अधिक आहे. सन1984 मध्ये सुमारे 3 कोटी रूपये खर्च करून या धरणाची उंची वाढवण्यात आली होती. त्यानंतर धरणातील गाळ काढणे या सारखीच कामे प्राधान्याने अधूनमधून करण्यात आली. सन 2012 मध्ये 19 लाख रुपये खर्च करून धरणातील गाळ काढण्यात आला.

तालुक्यातील कोंडीवली, अलसुरे, भोस्ते या गावातून बोरज धरणातून सुरू होणारी पाईपलाईन नेण्यात आली असून गेल्या कित्येक वर्षात या पाईपलाईनकडे दुर्लक्ष झाल्याने पाईपलाईन नादुरूस्त झाली होती. या धरणातील पाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक महिना आधीपर्यंत खेड शहराला यापूर्वी पुरत होते. परंतु, गेल्यावर्षी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा वेळेपूर्वी बंद झाला. यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसाने बोरज धरण भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 0.965 दशलक्ष घनमीटर आहे.

राज्यात एका बाजूला सरकार जलयुक्‍त शिवारसारख्या योजना व पाण्याच्या नियोजनासाठी विविध संवाद घडवत असताना सरकारने या धरणाचा अभ्यास करून त्यासाठी स्वतःहून पुढे येऊन विकासाची योजना आखण्याची गरज आहे.