Sun, May 26, 2019 20:37होमपेज › Konkan › वटपौर्णिमेसाठी आंध्रप्रदेशचा ‘तोतापुरी आंबा’ बाजारात

वटपौर्णिमेसाठी आंध्रप्रदेशचा ‘तोतापुरी आंबा’ बाजारात

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 8:08PMकणकवली : नितीन सावंत

अधिकमासमुळे वटपौर्णिमा यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात असल्याने उपवासासाठी स्थानिक हापूस, रायवळ आंबा उपलब्ध नाही. त्यामुळे या वर्षी  वटपौर्णिमेसाठी थेट आंध्र प्रदेशवरून तोतापुरी आंबा सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये  दाखल झाला आहे. किलोच्या भावाने या कच्च्या आंब्याची विक्री केली जात आहे. तर सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणावर फणस मुंबईसह पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी शहरांमध्ये रवाना झाले आहेत. वटपौर्णिमेसाठी शहरातील चौकांमध्ये फणस, आंबा, अननस आदींच्या विक्रेत्यांबरोबरच वानांचे स्टॉलही लागले आहेत. 

कोकणातील यावर्षीचा आंब्याचा सीझन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होता. पावसाचे प्रमाण वाढल्याने बाजारात येणार्‍या आंब्याचे प्रमाण हळहळू कमी झाले. दरवर्षी वटपौर्णिमेचा सण जूनच्या पहिल्या आठवड्यात येत असल्याने उपवासासाठी महिलांना मोठ्या प्रमाणावर  स्थानिक आंबे उपलब्ध असतात. मात्र, या वर्षी अधिकमासमुळे वटपौर्णिमेचा सण 27 जूनला आहे. अधिकमासमुळे हा सण लांबला असला तरी तोपर्यंत सिंधुदुर्गातील आंब्याचा सीझन संपून गेला असल्याने बाजारपेठांमध्ये त्याची जागा आता थेट आंध्रप्रदेशवरून आलेल्या तोतापुरी आंब्याने घेतली आहे. वटपौर्णिमेसाठी मोठ्या प्रमाणावर आंब्याची मागणी ग्राहकांकडून होत असल्याने यावर्षी फळविक्रेत्यांनी हा तोतापुरी आंबा बाजारात उपलब्ध केला आहे. 

‘तोता’ म्हणजे पोपट. पोपटाच्या चोचीच्या आकाराचा आंबा असल्याने त्याला तोतापुरी हे नाव पडले आहे. कर्नाटक राज्यातील ही आंब्याची प्रमुख जात असून त्याला बंगलोरा नावानेही ओळखले जाते. दोन्ही टोकांना निमूळते बाकदार असलेल्या आंब्याचा रंग हिरवट, पिवळसर आणि त्यावर चमकदार तांबूस पट्टे असतात. हा आंबा टिकावू असून भरपूर आणि नियमित उत्पादन मिळत असल्याने  हा आंबा दुरवरच्या बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. तोतापुरी आंबा दरवर्षी पावसाळ्यामध्ये सिंधुदुर्गात दाखल होत असतो. मात्र, या वर्षी वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.  

कोकणातील हापूस आंब्याचा सीझन संपल्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये तोतापुरी आंब्याचा सीझन सुरू होतो. दरवर्षी हा आंबा सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये पावसाळ्यात येत असतो. मात्र, या वर्षी वटपौर्णिमेसाठी हाच आंबा उपलब्ध असल्याने त्याची आवक वाढविण्यात आली आहे. आंध्र प्रदेशवरून हा आंबा निपाणी, इस्लामपूर, कोल्हापूर आदी शहरांमध्ये येतो. तेथून हा आंबा सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये दाखल होतो. गेल्या काही दिवसांपासूनच हा आंबा सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये पोहोचला असून 40 ते 50 रू. किलो दराने तो विकला जात आहे. किलोसाठी 3 ते 4 आंबे जोखले जातात. हापूस आंबा सर्र्‍हासपणे पिक ल्यानंतर विकला जातो. मात्र, तोतापुरी आंबा कच्चा असतानाच विकावा लागतो. हा आंबा खाण्यासाठी खोबर्‍याप्रमाणे असून त्याला ग्राहकांकडूनही चांगली मागणी असते असे कणकवलीतील फळांचे व्यापारी शब्बीर बागवान यांनी सांगितले. 

वटपौर्णिमेसाठी फणसालाही मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्गातील स्थानिक बाजारपेठांपेक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फणस रवाना झाले आहेत. मुंबईतील कोकणी माणसांची वस्ती असणार्‍या भागात सिंधुदुर्गातील नागरिक टेम्पो, ट्रकमधून फणस घेऊन पोहोचले आहेत. तर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये 50 ते 100 रु. दराने सध्या फणस विकला जात आहे. वटपौर्णिमेदरम्यान जोरदार पाऊस असल्याने स्थानिक बाजारपेठेमध्ये फणसाच्या  मागणीत घट होण्याची शक्यता आहे. तर अननससारखी फळेही बाजारपेठांमध्ये दाखल झाली असून त्यांनाही मोठी मागणी आहे. 

सौभाग्यवतींसाठी वाणांचे स्टॉल

वटपौर्णिमेच्या उपवासामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या, काळे मणी, हळदकुंकू याला मोठे महत्त्व आहे. सौभाग्यवतींकडून या वस्तूंना असणारी मागणी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षात वटपौर्णिमेच्या अगोदर शहरातील चौकाचौकात या वस्तूंचे एकत्रित पॅकेट असलेले स्टॉल लावले जातात. याही वर्षा असे स्टॉल चौकाचौकात थाटण्यात आले आहेत. दरवर्षी वटपौर्णिमेच्या निमित्ताने हे स्टॉल बाजारात लावले जातात.