Thu, Apr 18, 2019 16:16होमपेज › Konkan › उद्या जिल्ह्यातील डॉक्टर रस्त्यावर 

उद्या जिल्ह्यातील डॉक्टर रस्त्यावर 

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 11:00PMकुडाळ : प्रतिनिधी

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाच्या  (नॅशनल मेडिकल कमिशन)विरोधात रविवार 11 मार्च रोजी सकाळी 8.30 वा. कुडाळ हायस्कुल ते बाजारपेठ अशी भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत या बिलाचे तोटे समजावून सांगण्यात येणार आहेत. या रॅलीत जिल्हाभरातील आयएमएचे डॉक्टरर्स सहभागी होणार असल्याची माहिती आयएमएचे सचिव डॉ. संजय केसरे यांनी दिली. 

कुडाळ येथील डॉ. रावराणे यांच्या हॉस्पिटल हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. केसरे बोलत होते. डॉ. संजीव आकेरकर, डॉ. जयसिंह रावराणे उपस्थित होते.  डॉ. केसरे म्हणाले,  केंद्रसरकारने अचानक एमसीआय बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन बिल लोकसभेत मंजूरीसाठी ठेवले आहे. ज्यामध्ये बिगर वैद्यकीय व्यक्‍तींचा समावेश आहे. हे विधेयक आता इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संसदेच्या सर्व पक्षीय सदस्यांच्या विरोधामुळे स्टॅडिंग कमिटी पुढे ठेवण्यात आले आहे. या बिलाला देशभरातील आयएमएचा विरोध आहे. या बिलामध्ये ब्रीज कोर्स अंतर्भूत करण्यात आला आहे. यामुळे बिगर अ‍ॅलोपॅथिक व्यक्‍ती फक्‍त  सहा महिन्याच्या शिक्षणानंतर अ‍ॅलोपॅथीची औषधे देवू शकणार आहे. या बिलामुळे भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेवून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणार्‍या मुलांचे स्वप्न भंगणार आहे. सरकारी वैद्यकीय  महाविद्यालयातील जागा कमी होवून खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढणार आहे.  राज्य सरकारचे अधिकार हिरावून घेतले जातील. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियामध्ये सर्व राज्यातील आधुनिक वैद्य शास्त्राचा पदवीधर डॉक्टरांचा समावेश असतो परंतु हे बिल आल्यानंतर एका वेळेला सर्व राज्यातून फक्‍त 5 राज्यातील सदस्यांना समावेश राहणार आहे. मुलांना एक्झिट परीक्षेचा त्रास सहन करावा लागणार आहे. परीक्षेच्या खर्चातही भरमसाठ वाढ होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे विधेयक अ‍ॅलोपॅथीक वैद्यकीय व्यक्‍ती नियंत्रित करतील. ज्यांना अतिशय कमी वैद्यकीय ज्ञान असेल. रविवारी 11 मार्चला देशभरातील 1500 आयएमए एकाचवेळी विरोधात उतरणार आहेत. तसेच 25 मार्चला देशभरातील जवळपास 3 लाख  डॉक्टर दिल्‍ली येथील संजय गांधी स्टेडियमवर या बिलाच्या विरोधात एकत्रित येणार असल्याची माहिती डॉक्टर केसरे यांनी दिली.  अमेरिकेच्या धर्तीवर हे बिल राबवण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे त्याला आमच्या आयएमए संघटनेच्या वतीने तीव्र विरोध असल्याचे डॉ. आकेरकर यांनी सांगितले.