Thu, Sep 20, 2018 16:09होमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघाचे उद्या त्रैवार्षिक अधिवेशन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघाचे उद्या त्रैवार्षिक अधिवेशन

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 8:37PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ या संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. अलकानंद सभागृह, माजगाव-सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, सिंधुदुर्गचे  जिल्हाधिकारी उदय चौैधरी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. प्रदीप, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव कुबल, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवरी संघाचे प्रभारी अध्यक्ष शाम जोशी, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, माजगाव सरपंच मंगेश राठवड हे उपस्थित राहणार आहेत. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत संघाने तलाठ्यांचे विविध प्रश्‍न सोडविले. 1988 पासून तलाठी सजांची पुनर्रचना करण्याची मागणी होती, ती संघाच्या पाठपुराव्यांमुळे 2016 साली शासनाने पूर्ण केली. त्याशिवाय तलाठ्यांना कायमस्वरूपी प्रवास भत्ता, सहावा वेतन आयोग यासाठीही संघाने परिश्रम घेतले. आता सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करून तलाठ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी संघ प्रयत्नशील असल्याचे या संघटनेचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळालेले विद्यमान  जिल्हाध्यक्ष एस. व्ही.गवस यांनी सांगितले.

शासनाने सात बारा संगणकीकरणाचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे, परंतु आधी त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत हे काम पूर्ण करून घ्यायला हवे असे ते म्हणाले. या त्रैवार्षिक अधिवेशनाला तलाठी संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी केले आहे.