होमपेज › Konkan › हागणदारीमुक्‍त तालुक्यात अपात्र व्यक्‍तींना शौचालये! 

हागणदारीमुक्‍त तालुक्यात अपात्र व्यक्‍तींना शौचालये! 

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 8:41PMकुडाळ : प्रतिनिधी

निर्मल भारत ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत शौचालय लाभार्थी यादीत हागणदारी मुक्‍त कुडाळ तालुक्यातील पाट ग्रामपंचायतमध्ये 102 लाभार्थाची यादी होती.  त्यातील 23 जणांना अद्याप शौचालयाचे पैसेच मिळाले नाहीत. उलट ज्यांची नावे लाभार्थी यादीत नव्हती  त्या  व्यक्‍तींना लाभार्थी बनविण्याची किमया प्रशासकीय यंत्रणेने केली आहे. ही स्थिती कुडाळ तालुक्यातील वालावल,पांग्रड व कडावल ग्रामपंचायतमध्येही असल्याचा आरोप  सदस्यांनी करून या प्रकरणात झारीतील शुक्राचार्य कोण? त्याची चौकशी होवून कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

कुडाळ पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. उपसभापती श्रेया परब,गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई आदींसह पं. स. सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. 

पाट ग्रामपंचायमध्ये सन 2014 -15 मध्ये 105 लाभार्थ्यांची शौचालयाची यादी होती. यातील 79 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. मात्र, त्या यादीत 23 जणांची नावे दुबार आली. एका लाभार्थ्याचे नाव तर तीनवेळा आले आहे. परिणामी पात्र लाभार्थी अद्यापही शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत.सद्यस्थितीत उर्वरित 23 लाभार्थ्यांचा 1 लाख 27 हजारांचा निधीसुद्धा ग्रा.पं. मध्ये शिल्‍लक नसल्याची धक्‍कादायक  माहिती सदस्य डॉ. सुबोध माधव यांनी सभागृहात उघड केली.  

गटविकास अधिकारी  विजय चव्हाण यांनी या प्रकाराची चौकशी झाली असल्याचे सांगत पाट ग्रा.पं. मध्ये 102 पैकी 79 लाभार्थी शौचालयास पात्र होते. परंतु  पं.स.कडून 102 लाभार्थ्यांचे पैसे पाट ग्रामपंचायतकडे वर्ग केले. पाट ग्रामपंचायतीला याबाबत दोनवेळा शिल्‍लक 23 लाभार्थ्यांचे पैसे पंचायत समितीकडे वर्ग करा असे सूचित केले होते. याबाबत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांना नोटीस काढली. पैसे भरणा करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवकांनी वेळ देण्याची मागणी केल्याने त्यांना दोन महिन्याचा अवधी दिला आहे. पाट ग्रा.पं. ने तसा ठराव  केला आहे. तरीही ते पैसे भरणा न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, तसा प्रस्ताव जिल्ह्याकडे पाठविला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. वालावल, पांग्रड, कडावल ग्रामपंचायतीमध्ये असाच प्रकार झाल्याचा आरोप  सौ. प्राजक्‍ता प्रभू व शीतल  कल्याणकर  यांनी करून  चौकशीची मागणी केली.

वालावल महावितरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सहकार्य करत नाही. परिणामी जनतेचे प्रश्‍न जैसे थेच आहेत. कवठी गावातही विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याकडे प्राजक्‍ता प्रभू यांनी लक्ष वेधले. जांभवडे भागात तीन वीजपोल गेली दीड वर्षे लाईनच्या प्रतीक्षेत आहेत. गणपतीपूर्वी काम पूर्ण करा, अशी मागणी बाळकृष्ण मडव यांनी केली. 15 ऑगस्टपर्यंत रोजगार हमीचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करा, अशा सूचना डॉ. सुबोध माधव यांनी केली. तालुक्यातील नादुरूस्त शाळांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधत आंब्रड शाळेचे उदाहरण दिले होते. मात्र, प्रशासनाकडून केवळ आंब्रड शाळा इमारतीच्या छप्पर दुरूस्तीला प्रशासकीय मान्यता दिली.  

दुसरीकडे इतर शाळाच्या प्रशासकीय मान्यतेकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल अरविंद परब यांनी केला. तालुक्यातून 35 नवीन बंधार्‍यांची  मागणी करण्यात आली आहे. अजूनही काही कामे असल्यास ती लवकर सूचवावी असे लघुपाटबंधारे उपअभियंता नानल यानी आवाहन केले. शिवापूर येथील डॉक्टरवर कारवाई केली जाणार आहे. अलिकडेच सभापतींच्या भेटीदरम्यान ते डॉक्टर आरोग्य केंद्रात आढळून आले नाहीत. परिणामी त्याच्यावर कारवाई अटळ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी कांबळे यांनी सांगितले.  राजमाता सत्वशीलादेवी यांचे निधन व आंबेनळी घाटात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.