Sat, Dec 14, 2019 02:18होमपेज › Konkan › भारतात दिसणार आजचे चंद्रग्रहण

भारतात दिसणार आजचे चंद्रग्रहण

Published On: Jul 16 2019 1:57AM | Last Updated: Jul 16 2019 1:57AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

मंगळवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून पाहता येणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण जवळपास तीन तास सुरू असणार आहे. जिल्ह्यात पावसामुळे ढगाळ वातावरण असेल तर मात्र चंद्रग्रहण दिसणे कठिण आहे.

दि. 16 जुलै रोजी रात्री 1 वाजून 32 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी संपेल. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आहे. 149 वर्षानंतर एकाच वर्षी दोन चंद्रग्रहण आली आहेत. यापूर्वी सन 1870 साली हा योग जुळून आला होता. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतासोबतच अफगाणिस्तान, युक्रेन, तुर्की, इराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे.

वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही आणि अंधार पडतो याच स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्याने वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित होत नाही. आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाची सावली पाहण्याचा योग चंद्रग्रहणात येतो. 

चंद्राच्या तुलनेत सूर्याचा प्रकाश हा अधिक तेज असतो आणि तो डोळ्यांना नुकसान पोहचवू शकतो. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सोलर रेडिएशनमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे दृष्टी जाण्याची शक्यता असते. तर चंद्रग्रहण पाहताना सोलर रेडिएशनचा कुठलाच धोका नसतो आणि त्याचा डोळ्यांवर कुठलाच परिणाम सुद्धा होत नाही. त्यामुळेच तुम्ही चंद्रग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतात. मात्र ढगाळ वातावरणामुळे हे पाहायला अडसर होणार आहे.
    *  ढगाळ वातावरणाचा पाहण्यास अडसर
    * तीन तास सुरू राहणार चंद्रग्रहण  
    * नुसत्या डोळ्यांनी पाहू शकणार