Thu, Jun 27, 2019 18:36होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’ विरोधात आजच्या ‘बंद’ची जय्यत तयारी

‘रिफायनरी’ विरोधात आजच्या ‘बंद’ची जय्यत तयारी

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:56PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी विरोधासाठी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी व्हावा, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून गुरुवारी भरणारा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे.  या बंदमध्ये तालुक्यातील विविध बाजारपेठांतील व्यापारी सहभागी होणार आहेत .

शासनाने स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असतानादेखील रिफायनरी प्रकल्प कोकणवासीयांच्या माथी मारल्याच्या निषेधार्थ हा  तालुका बंद रिफायनरी विरोधी शेतकरी व मच्छीमार बांधवांकडून पुकारण्यात आला आहे. शासनाने हा प्रकल्प रद्द करावा यासाठी हा बंद असून बुधवारी राजापूर शहरासह तालुक्याच्या विविध बाजारपेठांत बंदचे आवाहन करण्यात आले. गुरुवारचा बंद 100 टक्के यशस्वी करुन दाखवायचाच, या निर्धाराने तयारी सुरु होती .गुरुवारी राजापूरचा आठवडा बाजार असतो. मात्र, या बंदमुळे तो रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे .

सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा केंद्र व राज्य शासनाची भागीदारी असणारा हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील सागवे -नाणार परिसरात होऊ घातला आहे. त्यासाठी आवश्यक जागा संपादन केल्यानंतर त्याची शासनाकडून होत असलेली मोजणी स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे रद्द करावी लागली होती. पण, शासनाने तरीदेखील हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

त्यामुळे समस्त प्रकल्प विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेला तालुका बंदचे आवाहन करावे लागले. त्यानुसार या बंदमध्ये शिवसेनेसह युवक काँग्रेस व अन्य पक्ष सहभागी होणार आहेत. आता गुरुवारी होणारा हा बंद कशा प्रकारे पार पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.