Tue, Mar 19, 2019 05:16होमपेज › Konkan › जिल्हा रुग्णालयात तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम

जनजागृतीतून लोकांचे जीवन सरंक्षित करा : डॉ. देवकर 

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनाचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. लोकांचे जीवन संरक्षित व्हावे यासाठी जनजागृतीतून त्यांना तंबाखू सेवनातील धोके समजावून सांगा, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित ‘तंबाखू व हृदयरोग’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. देवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी दंतशल्य चिकित्सक डॉ. भाग्योदय बरेवाड,  पिरंदवणे ग्रामपंचायत सरपंच श्रीकांत मांडवकर, मुरलीधर घाडगे, दंत रोगतज्ज्ञ शुभदा बडवे आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. देवकर म्हणाले की, देशात तंबाखू सेवनामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे उद्याची पिढी सुदृढ व्हावी यासाठी आरोग्य सेवेतील लोकांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. भाग्योदय यांनी चित्रफितीद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्वांनी मी तंबाखू खाणार नाही आणि दुसर्‍याला खाऊ देणार नाही याबाबत शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक प्राची जाधव यांनी तर आभार बबिता शेळके यांनी मानले.

शासकीय रुग्णालयात धुम्रपान करणार्‍यांना दंड

तंबाखू सेवनामुळे आरोग्य बिघडते याशिवाय इथे-तिथे थुंकल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न उद्भवतो. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात धुम्रपानास बंदी करण्यात आली असून, धुम्रपान करणार्‍यास 200 रुपये दंड आकारण्यात येतो. या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.