Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Konkan › हाऊसबोटी चालवण्यासाठी मिळेना व्यावसायिक

हाऊसबोटी चालवण्यासाठी मिळेना व्यावसायिक

Published On: Jun 30 2018 1:17AM | Last Updated: Jun 29 2018 8:47PMरत्नागिरी : प्रतिनिधी

एकीकडे जिल्ह्यात पर्यटनाचे नवनवे पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी अपेक्षा व्यक्‍त होत असताना सव्वा वर्षांपासून दाभोळ आणि बाणकोट खाडीत दाखल झालेल्या हाऊसबोट चालविण्यासाठी व्यावसायिकच मिळत नसल्याने त्या तशाच उभ्या आहेत.

समुद्र किंवा नदीच्या पाण्यातच बोटीमध्ये राहण्याची व्यवस्था करणारी ‘हाऊसबोट’ ही संकल्पना जुन्या हिंदी चित्रपटांमुळे सर्वदूर पसरलीच. परंतु, काश्मीरपाठोपाठ केरळसह दक्षिण भारतातही ती अधिक लोकप्रिय झाली. पाण्याच्याच सान्निध्यात राहण्याची ही मजा काही औरच असते. हीच संकल्पना कोकणात राबविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून गेल्या काही वर्षांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही संकल्पना अधिक उचलून धरण्यात आली आणि तेथे ‘एमटीडीसी’मार्फत तारकर्ली येथे हाऊसबोट सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर या सुविधेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तारकर्लीच्या धर्तीवर रत्नागिरीतही ही संकल्पना रुजावी आणि त्यातून पर्यटन वाढावे यासाठी ‘एमटीडीसी’ने दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे सव्वा वर्षांपूर्वीच प्रत्येकी 1 कोटींच्या दोन हाऊसबोटी दिल्या आहेत. या बोटीत राहण्याची व्यवस्था आहे. एका दिवसासाठी आठ हजार रूपये भाडे द्यावे लागणार आहे. यामध्ये दोन रूम्स असून जेवणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तर किमान दहा तास या बोटीतून जलप्रवासाचा अनुभव घेण्याची अट ठेवण्यात आली आहे. या बोट चालवण्यासाठी दोनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. परंतु, बोट चालविण्यासाठी कोकणातील व्यावसायिक तयार होत नसल्याने बोटी तशाच पडून आहेत. पाच वर्षांसाठी 10 ते 30 लाख रूपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे.  येथील व्यावसायिक तयार होत नसल्याने या ‘हाऊसबोटी’ तशाच पाण्यात उभ्या आहेत, असे ‘एमटीडीसी’ मार्फत सांगण्यात आले.