Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Konkan › खतांची भेसळ रोखण्यासाठी भरारी पथक

खतांची भेसळ रोखण्यासाठी भरारी पथक

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 8:48PMरत्नागिरी : प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा चांगला करावा, शेतकर्‍यांना मुबलक बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. खतांची भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करावी, खराब बी- बियाणे आणि भेसळयुक्‍त खते दिल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस . जगताप यांनी केले आहे. कृषी विभागाने उन्नत शेत आणि समृद्ध शेतकरी ही योजना युद्धपातळीवर राबवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 24 मे पासून गावागावांतील शेतकर्‍यांना बियाणे निवड व त्यावरील प्रक्रिया योग्य खताच्या मात्रा, टोकण पद्धतीने पेरणी व पाणी व्यवस्थापन आदींबाबत मार्गदर्शन मेळावे पार पडले.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार येत्या खरीप हंगामात पाऊस समाधानकारक राहण्याचे संकेत मिळाले आहेत. खरीप हंगामात शेतकर्‍यांना दर्जेदार आणि योग्य किमतीत बियाणे रासायनिक खते व इतर सामग्री पुरवण्याच्याद‍ृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. कोकणातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्चात कपात करण्याच्याद‍ृष्टीने तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी वापर करावा, म्हणजे उत्पादनांमध्ये निश्‍चित वाढ होते.  संकरित वाण वगळता प्रमाणित  बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ती तीन वर्षांपर्यंत वापरावेत. बियाणांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा, आवश्यक असणारी फवारणी आदींबाबत आवश्यक सूचना कृषी खात्याकडून दिल्या जात आहेत. जर शेतकर्‍यांनी कृषी खात्याने दिलेल्या मार्गदर्शना प्रमाणे शेती केली तर उन्नत शेती होईल व शेतकरी समृद्ध बनेल.

जिल्ह्यात काही भागात धूळवाफ पद्धतीने भाताची पेरणी झाली आहे. वेधशाळेने चालू हंगामात पाऊस होईल असा अंदाज जाहीर केला असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. या कालावधीत  खतांचा पुरवठा मुबलक करता यावा यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. शेतकर्‍यांना दर्जेदार आणि मुबलक बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खतांची भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. भेसळयुक्‍त खते दिल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई  करण्यात येणार आहे. त्यासाठी भरारी पथकांना दैनंदिन अहवाल  देण्याच्यी सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.