Sun, Dec 15, 2019 02:07होमपेज › Konkan › हत्तींसाठी तिलारी धरण बाहेरील क्षेत्रात अधिवास तयार करणार : पालकमंत्री दीपक केसरकर 

हत्तींसाठी तिलारी धरण बाहेरील क्षेत्रात अधिवास तयार करणार : पालकमंत्री दीपक केसरकर 

Published On: Jul 16 2019 1:57AM | Last Updated: Jul 15 2019 10:43PM
दोडामार्ग : वार्ताहर

हत्तीसमस्येने त्रस्त केर गावाला रविवारी रात्री  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत लवकरच हत्तींसाठी तिलारी धरणाबाहेरील क्षेत्रात अधिवास तयार करण्याची ग्वाही देली. तोपर्यंत हत्तींना हुसकावून लावण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत वनविभागाला सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यापासून केर ग्रामस्थ हत्ती समस्येने त्रस्त आहेत. केर व भेकुर्ली परिसरात ठाण मांडून बसलेला टस्कर थेट लोकवस्तीत घुसत आहे.  त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. या हत्तीने दोनवेळा तर एसटी बसही अडविली. या टस्कर हत्तीची दहशत केरवासीयांच्या मनात घर करून आहे. यापूर्वी केरवासीयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर केरवासीयांशी संवाद साधण्याकरिता ना. केसरकर यांनी केर  गावाला भेट दिली. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण,  सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक,  जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर,  सेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस, सभापती संजना कोरगावकर, केर सरपंचा सौ. मीनल देसाई, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, माजी सरपंच प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.केर चव्हाटा मंदिरात त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.  उपसरपंच महादेव देसाई यांनी केर गावातील हत्ती समस्यांचा पाढा वाचला व हत्तींच्या उपद्रवापासून कायमची सुटका करण्याबाबतचे निवेदन दिले. अनिर्णित क्षेत्र व वनसंवर्धनाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. त्यावर ना. केसरकर यांनी हत्तींसाठी तिलारी धरण बुडीत क्षेत्राबाहेर जंगलात हत्तीचा अधिवास तयार केला जाणार असून तेथे हत्तींना लागणार्‍या खाद्याची लागवड करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. शिवाय सौरऊर्जा कुंपणाबाबतही  सूचना दिल्याचे ते म्हणाले.