Tue, Nov 13, 2018 08:41होमपेज › Konkan › नाणार रिफायनरी रद्दसाठी आंबेरीच्या विठ्ठलाला साकडे

नाणार रिफायनरी रद्दसाठी आंबेरीच्या विठ्ठलाला साकडे

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 11:13PMराजापूर : प्रतिनिधी

विठुरायाचे दर्शन घडवूया... कोकणातून नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करूया...अशा गजरात नाणार प्रकल्पग्रस्तांनी कात्रादेवी ते आंबेरी विठ्ठल मंदिरादरम्यान दिंडीयात्रा काढून प्रकल्पाला असलेला विरोध दर्शविला. ही यात्रा भूमिकन्या एकता मंच व नागरी हक्‍क समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

आषाढी एकादशीनिमित्त साधून काढण्यात आलेल्या या यात्रेत प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.  टाळ - मृदंगांच्या गजरात प्रकल्पग्रस्त जयघोष करीत होते. विठुरायाचे दर्शन घडवूया ...कोकणातून  नाणार रिफायनरी रद्द  करूया, असा फलक सर्वात पुढे झळकत होता. कात्रादेवी येथून दिंडी यात्रेला सुरवात झाली. शासनाने लादलेला प्रकल्प तात्काळ केला जावा, अशी मागणी करीत प्रकल्पग्रस्त दिंडीयात्रेत सहभागी झाले होते.

अंबेरी विठ्ठल मंदिरापर्यंत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. स्थानिक जनतेचा शंभर टक्के विरोध असतानाही  प्रकल्प रेटवू पहाणार्‍या शासनाला पांडुरंगाने  बुद्धी  द्यावी, यासाठीच आषाढी यात्रेनिमित्त ही दिंडीयात्रा आयोजित करण्यात आली होती, असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.