सावर्डे : वार्ताहर
जनतेच्या सुरक्षितता आणि संरक्षणासाठी कार्यतत्पर असलेल्या पोलिसांच्या कर्तव्याचे मोजमाप करण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत असून नशेत वाहने चालवणार्यांना पोलिसी खाक्याचा धाकच उरला नाही. पोलिस जर नशेबाज चालकांची नशा उतरवण्यात कमी पडत असतील तर आम्हालाच आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.
यावेळी शेखर निकम म्हणाले, खेरशेत अपघात दुर्घटनेबाबत दोषींवर व संबंधित कंपनीवरही कारवाई करावी. संबंधित कंपनीच्या डंपरखाली सहा महिन्यांत चार लोकांचा बळी गेला आहे. सहा महिन्यांपूर्वी चिपळूण एस. टी. डेपोचे व्यवस्थापक शिलेवंत यांचा बळीदेखील कामथे घाटात याच कंपनीच्या डंपर चालकाने घेतला होता. त्यावेळी त्या चालकाला शिक्षा झाली नाही. असे वारंवार अपघात होत राहिले तर सामान्य माणसाला रस्त्यावरून फिरणे मुश्किल होईल.
मुंबई-गोवा महामार्गावर माणसे किड्या, मुंग्यासारखी वाहनाखाली चिरडत असतील तर आम्ही गप्प बसायचे का? असा सवाल करत त्यांनी वाहतूक पोलिसांवर निशाणा साधला. आमचे पोलिस काय करतात? वाहतुकीवर नियंत्रण का ठेवत नाहीत? असे प्रश्नदेखील निकम यांनी उपस्थित केले. 10 वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर 768 माणसे मृत्युमुखी पडली आहेत. माझ्या निरपराध माणसांचे हकनाक प्राण जात आहेत. या अपघातांना प्रामुख्याने वाहन चालवणार्या चालकांची नशाच कारणीभूत ठरत आहे.
‘ड्रंक ड्राईव्ह’ ची चाचणी केवळ देखावा झाला आहे. पोलिस कधी करतानादेखील पहावयास मिळत नाहीत. खेरशेत येथे झालेल्या अपघातात आमच्या माता भगिनींचे रक्ताळललेे मृतदेह पाहताना अंगाचा थरकाप उडाला. नशेत असलेल्या डंपर चालवणार्या चालकाने तिघींना चिरडले आणि फरार झाला. याचा तपास होऊन कारवाई झालीच पाहिजे. काही पोलिसांना नको त्या गोष्टीत जास्त रस वाटत आहे.
कामथे घाटात वाहने अडवली जातात. नुसता दिखाऊपणा काय कामाचा? उगीचच सर्वसामान्याला अडवणूक करून त्रास देण्यापेक्षा समाजासाठी उपयुक्त असणार्या बाबींकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. पोलिसांचे काही वेळा महत्त्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठ्या दुर्घटनांना जनतेला सामोरे जावे लागत असल्याचे शेखर निकम म्हणाले.
काही पोलिसांना नको त्या गोष्टीत रस
नशेबाज चालकांमुळे निरपराधांचे जीव जात असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. तसा चालक आढळल्यास त्याचा वाहन परवाना व चालकाचा परवाना रद्द करावा, असा आक्रमक पवित्रा आरटीओ विभागाने घ्यावा. काही वाहतूक पोलिसांचा नको त्या गोष्टीत रस वाढत असून आवश्यक त्या गोष्टींकडे कानाडोळा केला जात आहे.
-समीर काझी ( तंटामुक्ती अध्यक्ष, कामथे)
Tags : Konkan, Time, measure, duties, police